पनवेल : रामप्रहर वृत्त
दिवाळी सण म्हणजे आनंद, उत्साह, प्रकाश आणि संस्कृतीचा मिलाफ. या पार्श्वभूमीवर स्पंदन एंटरटेनमेंट तर्फे रविवारी सेक्टर 21, सिडको गार्डन, खारघर येथे दिवाळी पहाट या सुरेल कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर उपस्थित होते. या वेळी त्यांनी दिवाळीत समाजात आनंद, एकोपा आणि कलाविष्काराची जपणूक होत असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे आयोजन शाश्वत फाउंडेशनच्या सहकार्याने करण्यात आले होते. संस्थेच्या अध्यक्षा बीना गोगरी यांनी या कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केले. मराठी सुगम संगीताच्या गोड सुरांनी सजलेल्या या दिवाळी पहाट कार्यक्रमाने उपस्थित नागरिकांना सकाळच्या वेळेस नव्या उर्जेचा आणि आनंदाचा अनुभव दिला.
या वेळी आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले, दिवाळी म्हणजे आपल्या संस्कृतीचा उत्सव. अशा सांस्कृतिक उपक्रमांमुळे समाजात आनंद, एकोपा आणि कलाविष्काराची जपणूक होते. स्पंदन एंटरटेनमेंटसारख्या संस्था वर्षभर समाजहिताचे कार्यक्रम राबवत असतात, याचे कौतुक करावे तितके थोडेच आहे, असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमात स्पंदन म्युझिक एकेडमी चे संस्थापक गफार शेख, सौरभ पान्डे, चारू तबडके, प्रफुल्ल माणगांवकर, रविंद्र अहिरे, रवी वेंगुर्लेकर, समता मोदी, सारंग मोदी आदि गायकांनी आपल्या सुरेल गाण्यांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. या कार्यक्रमाला भाजपचे नेते आणि खारघर शहराचे माजी अध्यक्ष ब्रिजेश पटेल, पनवेल तालुका चिटणीस सचीन वासकर, भाजपा खारघर मंडल सरचिटणीस दिपक शिंदे, भाजपा खारघर मंडल उपाध्यक्ष अमर उपाध्याय, जागृत फाऊंडेशन चे अध्यक्ष ज्ञानेश्वर खरपुरिया व उपाध्यक्ष शिवम सिंग, रोटरी क्लब मिडटाऊन खारघरचे अध्यक्ष शैलेश पटेल,अन्जु पटेल, स्मिता आचार्य, नीता गोगरी यांच्यासह शेकडो श्रोत्यांनी या मैफिलीचा आनंद घेतला. दिवाळीच्या या शुभप्रसंगी स्पंदन एंटरटेनमेंट आणि शाश्वत फाउंडेशन तर्फे समाजात सांस्कृतिक आणि सामाजिक एकात्मतेचा संदेश देण्याचा प्रयत्न यशस्वी ठरला.
Check Also
सुभाष घईंच्या दिग्दर्शनाची यशस्वी पन्नाशी
तुम्हालाही माहित्येय आज आपण डिजिटल युगात वावरतोय, चित्रपट माध्यमात व्हीएफएक्स आणि एआय तंत्रज्ञानाचा वापर वाढलाय, …
RamPrahar – The Panvel Daily Paper