Breaking News

अटल करंडक एकांकिका स्पर्धेचे 12वे पर्व रंगणार

6 नोव्हेंबरपासून प्राथमिक फेरी

पनवेल : रामप्रहर वृत्त
श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येणार्‍या राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेचे यंदा 12वे पर्व रंगणार आहे. त्या अंतर्गत राज्यातील प्राथमिक केंद्रांच्या प्राथमिक फेरीला 6 नोव्हेंबरपासून प्रारंभ होणार आहे.
नाट्यचळवळ वृद्धींगत करण्यासाठी व नाट्यरसिकांना आपले नाट्याविष्कार प्रदर्शित करता यावे, त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळावे तसेच देशाचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या विचारांचा वारसा अविरतपणे पुढे चालत राहावा यासाठी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखेचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, उपाध्यक्ष परेश ठाकूर यांनी रंगमंच आमचा कलाविष्कार तुमचा हे ब्रीदवाक्य घेऊन अटल करंडक एकांकिका या दर्जेदार स्पर्धेचा प्रारंभ केला. देखणे व नेटके संयोजन, आकर्षक पारितोषिके, दर्जेदार परीक्षण आणि सर्वोत्तम स्पर्धास्थळ या स्पर्धेची वैशिष्ट्ये आहेत. स्पर्धेत नवनवीन संकल्पना आणि दर्जेदार एकांकिका सादर होत असल्याने हा करंडक महाराष्ट्रभर सुप्रसिद्ध झाला असून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत स्पर्धेचा आवाका वाढला आहे. गेल्या 11 वर्षांत स्पर्धेने नाट्यविश्वात एक वेगळे स्थान निर्माण केले असून ही स्पर्धा नाट्यरसिकांच्या गळ्यातील ताईत बनली आहे.
स्पर्धेच्या अंतिम फेरीतील प्रथम क्रमांक विजेत्या एकांकिकेस एक लाख रुपये, प्रमाणपत्र आणि मानाचा अटल करंडक; द्वितीय 75 हजार रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह; तृतीय 50 हजार रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह; उत्तेजनार्थ दोन बक्षिसे प्रत्येकी 10 हजार रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह तसेच लक्षवेधी एकांकिकेला 30 हजार रुपये प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, उत्कृष्ट विनोदी एककांकिकेला 20 हजार रुपये प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह आणि इतरही वैयक्तिक पारितोषिके देऊन कलाकारांना गौरविण्यात येणार आहे.
या स्पर्धेतील सोलापूर केंद्राची प्राथमिक फेरी 6 नोव्हेंबरला, कोल्हापूर 7 नोव्हेंबर, रत्नागिरी 8 नोव्हेंबर, नाशिक 15 नोव्हेंबर, जळगाव 16 नोव्हेंबर, पुणे 22 व 23 नोव्हेंबर, रायगड 26 व 27 नोव्हेंबर आणि मुंबई व ठाणे केद्रांची प्राथमिक फेरी 28, 29 व 30 नोव्हेंबर रोजी नियोजित केंद्रांवर होणार आहे. त्यानंतर महाअंतिम फेरी 5, 6 आणि 7 डिसेंबर रोजी पनवेलमधील आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात होईल, अशी माहिती आयोजकांकडून देण्यात आली.

Check Also

नांदगाव येथे भाजप महायुतीचा जोरदार प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात …

Leave a Reply