माथेरान ः प्रतिनिधी
माथेरान हे एक सुंदर पर्यटनस्थळ आहे. येथील पर्यटन वाढावे यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न केले जातील तसेच त्याकरिता लागेल तेवढा निधी आम्ही देऊ, अशी ग्वाही राज्याचे पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी मंगळवारी (दि. 25) येथे दिली. ते भाजप, शिवसेना, रिपाइं मित्रपक्ष महायुतीच्या जाहीर सभेत बोलत होते.
माथेरान गिरीस्थान नगर परिषदेच्या निवडणूक रिंगणात असलेले महायुतीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार चंद्रकांत चौधरी आणि नगरसेवकपदाचे 20 उमेदवार यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेच आयोजन माथेरान येथील मुख्य बाजारपेठेत असलेल्या श्री राम चौकात करण्यात आले होते. व्यासपीठावर पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांच्यासह मावळचे खासदार श्रीरंग बारणे, भाजप रायगड जिल्हा निवडणूक प्रभारी व पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, स्थानिक आमदार महेंद्र थोरवे, भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, कर्जत विधानसभा अध्यक्ष किरण ठाकरे, जि.प.चे माजी अध्यक्ष सुरेश टोकरे, युवासेनेचे प्रसाद थोरवे व अन्य मान्यवर उपस्थित होते. माथेरानमधील या पहिल्याच राजकीय सभेसाठी महायुतीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांसमवेत येथील स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महायुतीच्या सर्व उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करावे, असे आवाहन मंत्री देसाई यांनी केले.
खासदार श्रीरंग बारणे यांनी आपल्या भाषणात माथेरानमधील बंद होणारी मिनीट्रेन पुन्हा सुरू व्हावी यासाठी प्रयत्न केल्याचे व निधी पडून दिला नसल्याचे सांगितले. आमदार प्रशांत ठाकूर यांनी येथील पर्यायी रस्त्यासाठी मी माथेरानवासीयांसोबत असल्याचे सांगितले. फिनिक्युलर रेल्वे व रोप वे प्रकल्प सुरू करण्यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. आमदार महेंद्र थोरवे यांनी, पार्किंगचा प्रश्न गांभीर्याने घेतला असून यासाठी एमपी 93 प्लॉट नगरपालिकेकडे हस्तांतरित करण्यासाठी जलद गतीने प्रयत्न केले जातील, असे म्हटले. यासाठी महायुतीच्या सर्व उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करावे आणि पुन्हा एकदा माथेरान नगरपालिकेवर भगवा झेंडा फडकला पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले.
माथेरान शिवसेना शहरप्रमुख मनोज खेडकर यांनी प्रास्ताविक केले, तर भाजप शहराध्यक्ष प्रवीण सकपाळ यांनी आलेल्या मान्यवरांचे स्वागत करीत सगळ्यांचे आभार मानले.
Check Also
सुभाष घईंच्या दिग्दर्शनाची यशस्वी पन्नाशी
तुम्हालाही माहित्येय आज आपण डिजिटल युगात वावरतोय, चित्रपट माध्यमात व्हीएफएक्स आणि एआय तंत्रज्ञानाचा वापर वाढलाय, …
RamPrahar – The Panvel Daily Paper