Breaking News

काही पुरस्कार मानाचे, तर काही शोभेचे (तेही हवेत)

वर्ष 2025 संपता संपता मराठी चित्रपटसृष्टीसाठी एक अतिशय सकारात्मक चांगली बातमी आली. पणजी, गोवा येथे आयोजित करण्यात आलेल्या भारताच्या 56व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी)मध्ये ‘गोंधळ’ या मराठी चित्रपटाने ‘सिल्व्हर पिकॅाक इंटरनॅशनल सेक्शन’मध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार पटकावला आहे. गेल्या 56 वर्षांत पहिल्यांदाच मराठी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकचा अवॉर्ड मिळाल्याने हा विजय अधिकच ऐतिहासिक ठरला आहे.
यंदा ‘इफ्फी’मध्ये 1130चित्रपटांची नोंदणी करण्यात आली होती. त्यातील 570 फिचर फिल्म्स होत्या. त्या चित्रपटांमधून हा सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा अवॉर्ड ‘गोंधळ’ला मिळाला असून पंधरा लाख रुपये रोख आणि मानांकन असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. हा सोहळा गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाचे राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन, माहिती व प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू, माहिती आणि प्रसारणमंत्री अश्विनी वैष्णव, दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत, ऋषभ शेट्टी, रणबीर सिंग, नवाजुद्दीन सिद्दीकी आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.
2019 साली ‘जल्लीकट्टू’ या चित्रपटाच्या लिजो जोस यांना सिल्व्हर पिकॅाक सेक्शनमध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकासाठी अवॅार्ड मिळाला होता. त्यानंतर कोणत्याही भारतीय चित्रपटाला सिल्व्हर पिकॅाक सेक्शनमध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा अवॉर्ड मिळाला नव्हता. संतोष डावखर यांचे दिग्दर्शकीय पदार्पण असतानाही त्यांना थेट सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा अवॅार्ड मिळाला आहे.
हा चित्रपट आपल्या मातीत रुजलेल्या श्रद्धा, लोकपरंपरा आणि मानवी भावना यांचं प्रभावी चित्रण करतो. नवरा-नवरीच्या आयुष्यातील विघ्नं दूर करण्यासाठी साजर्‍या होणार्‍या ‘गोंधळ’ या पारंपरिक विधीच्या पार्श्वभूमीवर उभी राहाणारी कथा केवळ धार्मिक विधीपुरती मर्यादित न राहाता अंधश्रद्धा, कुटुंबातील नात्यांचे संघर्ष, समाजात बदलणारे दृष्टिकोन आणि माणसांच्या मनात दडलेला रहस्याचा धागा यांचाही वेध घेते. ‘गोंधळ’ची कथा, पटकथा, संवाद, दिग्दर्शन संतोष डावखर यांनीच केले असून डावखर फिल्म्स निर्मित या चित्रपटाच्या सहनिर्मात्या दीक्षा डावखर आहेत. किशोर कदम, इशिता देशमुख, योगेश सोहोनी, निषाद भोईर, अनुज प्रभू, सुरेश विश्वकर्मा, माधवी जुवेकर, ऐश्वर्या शिंदे, कैलाश वाघमारे, प्रभाकर मठपती, विठ्ठल काळे, प्रवीण डाळींबकर, शरद जाधव, पूनम पाटील आणि ध्रुव ठोके या कलाकारांची फळी या चित्रपटात आहे.
असा पुरस्कार मराठी चित्रपटसृष्टीसाठी उत्साह वाढवणारी बातमी आहे. विशेषतः मनोरंजनाची चौकट सांभाळून काही वेगळे करु इच्छिणार्‍या निर्माते, पटकथा संवाद लेखक, दिग्दर्शक आणि कलाकार यांच्यासाठी ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे.
याच वर्षी साठाव्या महाराष्ट्र राज्य चित्रपट महोत्सवात सई ताम्हणकरला सचिन कुंडलकर दिग्दर्शित ‘पॉन्डेचरी’ चित्रपटासाठी आणि अमृता खानविलकरला प्रसाद ओक दिग्दर्शित ‘चंद्रमुखी’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार प्राप्त झाला हेदेखील विशेष उल्लेखनीय, कारण त्या प्रामुख्याने ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून लोकप्रिय आहेत, पण त्यांच्या अभिनयावर शिक्कामोर्तब होण्याची गरज होती. ती यातून पूर्ण झाली. या सोहळ्याच्या वेळी अमृता खानविलकर अमेरिकेत आपल्या नृत्याच्या कार्यक्रमाचा मनसोक्त मनमुराद आनंद घेत होती तरी तिचं लक्ष मुंबईतील या पुरस्कार सोहळ्याकडे होते. यालाच आपल्या कामावरचे प्रेम म्हणतात.
एक छोटीशी आठवण करून देतो, आजा रे परदेसी (मधुमती 1958), कहीं दीप जले कहीं दिल… (बीस साल बाद 1962), तुम्ही मेरे मन्दिर तुम्ही मेरी पूजा (खानदान 1965) आणि आप मुझे अच्छे लगने लगे (जीने की राह 1969) या चार फिल्म फेअर पुरस्कारानंतर
लता मंगेशकर यांनी जाहीर केले, यापुढे या पुरस्कारासाठी आपल्या नावाचा विचार करण्यात येऊ नये; अन्य कोणाला तरी हा पुरस्कार प्राप्त व्हावा. आणि हे पथ्य पाळले गेले. यात त्यांची एक प्रकारची या पुरस्काराबाबतची तृप्तता दिसते, समाधान दिसते.
धर्मेंद्रला यशस्वी कारकीर्दीच्या तब्बल पन्नास वर्षांनंतर फिल्म फेअरने जीवन गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले तेव्हा हा पुरस्कार स्वीकारताना तो अतिशय भावूक होत म्हणाला, आपल्याला आयुष्यात कधीच कोणताच पुरस्कार प्राप्त झाला नाही. याचे कारण, मी त्या पठडीतील अभिनय कधीच केला नाही. आणि मी जे काही रुपेरी पडद्यावर करत आलो त्याला समिक्षकांनी आणि परीक्षकांनी कधीच गांभीर्याने घेतले नाही. धर्मेंद्रच्या या बोलण्यात स्वतःकडे पाहण्याचा तटस्थपणा आणि दु:ख दिसत आहे. या गोष्टीची नुकतीच चर्चा झाली हे वेगळे सांगण्याची गरज नाही. अजिंक्य देवची लक्षवेधक भूमिका असलेल्या राजदत्त दिग्दर्शित ’सर्जा’ (1987) या चित्रपटाला राज्य चित्रपट महोत्सवात एकाही विभागात पुरस्कार प्राप्त न झाल्याने या चित्रपटाचे निर्माते व अभिनेते रमेश देव अतिशय रागावले, व्यथित झाले आणि त्यांनी मुंबईतील आम्हा काही सिनेपत्रकारांसमोर आपली ही नाराजी व्यक्त केली. आपण अतिशय मेहनतीने साकारलेल्या या ऐतिहासिक कलाकृतीला पूर्णपणे डावलल्याचे दु:ख त्यांच्या बोलण्यात जाणवत होते. (राष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मात्र ’सर्जा’ला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा रौप्य कमळ पुरस्कार प्राप्त झाला.) असं का घडते? अमृता राव निर्मित आणि सुजय डहाके दिग्दर्शित ‘श्यामची आई’ या चित्रपटाला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले पण राज्य चित्रपट महोत्सवात हा चित्रपट पूर्णपणे
डावलला गेला.
आपल्या लक्ष्मीकांत बेर्डेला राज्य चित्रपट महोत्सवात ’घोळात घोळ’ (1987) मधील अभिनयासाठी उत्कृष्ट अभिनेता हा पुरस्कार प्राप्त झाल्याने त्याला आश्चर्य वाटले होते, तर डॉ. जब्बार पटेल दिग्दर्शित ’एक होता विदूषक’ (1992) या चित्रपटातील अभिनयासाठी नामांकन होते पण पुरस्काराने हुलकावणी दिल्याने लक्ष्मीकांत बेर्डे आपली नाराजी कधीच लपवू शकला नाही. ही गोष्ट त्याने फारच मनाला लावून घेतली होती. बरेच दिवस तो याबाबत नाराज होता. आणि तो ते बोलूनही दाखवलं असे.
आपल्या भरत जाधवला ’झिंग चिक झिंक’ (2009) यातील अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राज्य चित्रपट महोत्सवात पुरस्कार प्राप्त झाल्यावर एकदा मला तो म्हणाला, मी चित्रपटात भूमिका साकारायला सुरुवात केल्यावर पंचवीस वर्षांनी माझ्यासाठी हा योग आला. त्याच्या बोलण्यात मला असं जाणवलं की, मी दर्जेदार अभिनय करतो यावर इतक्या वर्षांनंतर परीक्षकांना विश्वास बसला.
…. चित्रपट पुरस्कारांचे महत्व यातून अधोरेखित होतेय. यात एक प्रकारचे हळवेपण होते. आता काळ बराच बदललाय. ऑस्कर, राष्ट्रीय चित्रपट, राज्य चित्रपट महोत्सव, भारताचा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव यासह बरेच चित्रपट पुरस्कार आहेत. त्याचे रंगतदार सोहळे आहेत. रेड कार्पेटवर चमकणे, चकाकणे आहे. एक प्रकारची ती देखणी फॅशन परेड असते. त्यात झटपट पटपट मुलाखती असतात.
आज वर्षभर सतत कोणता ना कोणता चित्रपट पुरस्कार सोहळा सुरुच असतो. ते पुरस्कार मागील वर्षासाठीच्या सिनेमासाठी आहेत की या वर्षीच्या चित्रपटासाठी आहेत यातील फरक बराचसा संपुष्टात आला आहे. याची लागण दशकभरापूर्वीच झालीय. ’पुरस्कारशिवाय कोणीही राहू नये’ असाच त्यामागे उदात्त विचार असूही शकतो. (कोरोनामुळे पुरस्कार टाईम टेबल बिघडले असे कोणीही बोलू नये. तत्पूर्वीच ’इकडे पुरस्कार प्राप्त झाला नाही तर तिकडे निश्चित’ असा सकारात्मक दृष्टिकोन विकसित झालाय.)
दादासाहेब फाळके यांच्या नावाने भारत सरकारचा अतिशय प्रतिष्ठित असा मानाचा पुरस्कार असूनही अनेक संस्थानी त्या नावाने ’पुरस्कार जल्लोष’ सुरू केलाय आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवर तो स्वीकारत आहेत. पुरस्कार सज्ञानता आवश्यक आहे का हो? तर ह़ोय. दादासाहेब फाळके पुरस्कार एकच असावा आणि अर्थातच तो भारत सरकारच्या वतीने देण्यात येणारा तोच असावा. त्याला प्रतिष्ठा व विश्वासार्हता आहे. अतिशय मानाचा असा तो पुरस्कार आहे.
चित्रपटाच्या जोडीला मालिका, गेम शोज, रिलिटी शोज, अल्बम, वेबसिरिज ,सोशल मिडियात रिल, फिटनेस, आकर्षक लूक, फॅशन फंडा यांचीही चर्चा वाढल्याने पुरस्कार संख्याही वाढलीय. त्यात जाहिरातपट, उत्तम फोटो सेशन, सोशल मिडिया पोस्ट, इव्हेन्टसमधील ड्रेस असेही पुरस्कार सुरु व्हावेत. पुरस्कार कोणाला नकोत? अशी संख्या वाढताच अधिकाधिक जण खुश होतील. उत्तम फोटोजेनिक व्यक्तीमत्व म्हणून पूजा सावंतची निवड निर्विवाद. तिचा प्रत्येक फोटो मागच्यापेक्षा अधिक सरस आणि देखणा असा.
अशा पध्दतीने वर्षभरची हुकमी गोष्ट म्हणजे, मनोरंजन क्षेत्रातील पुरस्कार पुराण. हे पीक का आले? अनेक शहरांतील लहान मोठ्या संस्था, माध्यम समूह यांच्या वार्षिक उलाढालीत ’इव्हेन्टस’ला महत्व आहे. त्यासाठी आर्थिक उलाढाल आपोआपच वाढली. त़ो खर्च करण्याची तयारीही आहे. आज सगळाच मामला दिखाऊपणा महत्वाचा असा आणि आपणच दिसायला हवे ही इच्छा असलेला. तर मग हे चालणारच. त्यात काही चित्रपट पुरस्कार वेगळे. गोंधळ या चित्रपटाला तोच मिळाला आहे. तर हे चित्रपट पुरस्कार मनोरंजन वाहिन्यांसाठी एक ग्लॅमरस टी. व्ही. शो असतो. अनेक सेलिब्रिटीजना आपला परफॉर्मन्स खुलवायची संधी वाढली. (पुरस्काराच्या बदल्यात एक डान्स अथवा एका परफॉर्मन्सची परतफेड म्हणून पुरस्कार अशीही देवाणघेवाण असते म्हणे. विद्या बालनने यावरुन शाहरुख खानला अशाच एका इव्हेन्टसमध्ये खोचक प्रश्न विचारलाच. यू ट्यूबवर आहे बघा.काय भारी दृश्य आहे बघा.), अनेक सेलिब्रिटीजना फॅशनेबल ड्रेसमध्ये वावरायची संधी आणि या सगळ्यावर फिल्मी मीडियाचा भारी फोकस. रिल आणि गॉसिप्स जणू हातात हात घालून चालतात. असो.
एक ताजी बातमी, मकरंद देशपांडे, मुरली शर्मा, सई ताम्हणकर, भाऊ कदम व सिद्धार्थ जाधव यांच्यासह कुमार शानू यांना 25वा नटसम्राट बालगंधर्व पुरस्कार प्रदान करण्यात आले. ही आठवड्यापूर्वीची बातमी.
पुरस्कारांचा बाराही महिने शो सुरु असल्याने सेलिब्रिटीजच्या भेटीगाठीची संधी वाढलीय अन्यथा आज एकमेकांना भेटायला वेळ आहे कुठे? सेटवर दिग्दर्शक ओ.के. म्हणताच जो तो आपापल्या व्हॅनिटीत बंद. बाहेरच्या जगाशी संबंध तो काय आणि कशाला? ही कोंडी इव्हेन्टस फोडतेय. अशातच जीवन गौरव पुरस्कार प्राप्त मान्यवरांचे कौतुक करायचीही संधी. (वाढत्या पुरस्कारांमुळे कदाचित या पुरस्कारासाठी वयाची अलिखित मर्यादा थोडी कमी करावी लागेल का हो?)
एखाद्या गोष्टीची वाढ काही चांगल्या गोष्टी, काही नवीन कल्पना तर काही अनावश्यक गोष्टी घेऊन येते. पुरस्कार वाढीत ते सगळेच आहे. म्हणूनच ’मानाच्या पुरस्कारां’चे महत्त्व आणि विश्वासार्हता टिकून राहील… पुरस्कार कलाकाराचा हुरुप वाढवतो. आत्मविश्वास वाढवतो. आपण जिंकलोय असा अभिमान, स्वाभिमान जागा करतो. यासाठी पुरस्कार हवाच. जीवन गौरव पुरस्कार तर वयाच्या साठीच्या आसपास मिळावा. त्यामुळे पुन्हा चार्ज झाल्यासारखे वाटते. नवीन ऊर्जाच तर त्यातून मिळते. म्हटले ना, काही पुरस्कार मानाचे, काही घ्यायचे तर काही शोभेचे असतात…

  • दिलीप ठाकूर, चित्रपट समीक्षक

Check Also

पनवेलमध्ये भाजप स्थापना दिन उत्साहात साजरा

पनवेल : रामप्रहर वृत्तजगातील सर्वात जास्त सदस्य असलेल्या भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस सोमवारी (दि. …

Leave a Reply