Breaking News

लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी प्रभाग 2मधील मतदार आणि कार्यकर्त्यांशी साधला संवाद

पनवेल ः रामप्रहर वृत्त
पनवेल महापालिकेची निवडणूक आता रंगात आली असून प्रभाग क्रमांक 2मध्ये भाजप महायुतीचा प्रचार जोरात सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी प्रभाग क्रमांक 2मधील मतदार आणि कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधत प्रचाराला नवी ऊर्जा दिली. त्यांच्या उपस्थितीमुळे संपूर्ण प्रभागात उत्साहाचे वातावरण निर्माण झालेे.
प्रभाग क्रमांक 2मधून भाजप महायुतीचे उमेदवार दिनेश खानावकर, कृष्णा पाटील, काजल पाटील आणि अरुणा दाभणे निवडणुकीच्या रिंगणात असून त्यांच्या प्रचारासाठी आयोजित या दौर्‍यादरम्यान लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्यासह भाजपचे ज्येष्ठ नेते जे.एम. म्हात्रे, वाय.टी. देशमुख यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
या वेळी बोलताना लोकनेते रामशेठ ठाकूर म्हणाले की, पनवेलचा सर्वांगीण आणि वेगवान विकास साधायचा असेल तर केंद्र सरकार, राज्य सरकार आणि महापालिका या ट्रिपल इंजिनची ताकद सत्तेवर असणे अत्यावश्यक आहे. येथील महापालिकेत आपले एकूण 66 नगरसेवक होते. यंदाच्या निवडणुकीत आपल्याला केवळ 66वर थांबायचे नाही, तर त्यापेक्षा जास्त नगरसेवक निवडून आणायचे आहेत. त्यासाठी महायुतीच्या उमेदवारांनी अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहचून केलेली विकासाची कामे सांगितली पाहिजेत.
लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पुढे बोलताना सांगितले, आता मी आणि जे.एम. म्हात्रे एकत्र आलो आहोत. त्यामुळे आपली ताकद अधिक वाढली आहे. त्याचबरोबर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय आणि मित्रपक्षांचीही मजबूत साथ आपल्या पाठीशी आहे. त्यामुळे या प्रभागातील चारही उमेदवार प्रचंड मतांनी विजयी होतील याबाबत मला कोणतीही शंका वाटत नाही.
या प्रचार दौर्‍यात भाजप नेते जितेंद्र म्हात्रे, महेश पाटील, अशोक साळुंखे, राजू शेळके, रामदास फडके, काळूराम फडके, महेंद्र म्हात्रे, आकाश फडके, रूपेश फडके, विजय म्हात्रे, विजय पाटील यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांना महाराष्ट्र प्रदेश भाजप चिटणीसपदाची मोठी जबाबदारी

पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीची घोषणा …

Leave a Reply