Breaking News

नितीन पाटील यांच्या रूपाने पनवेलला मिळणार पहिला आगरी समाजाचा महापौर

उपमहापौरपदासाठी प्रमिला पाटील यांचा अर्ज दाखल

पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौरपदाकरिता होणार्‍या निवडणुकीसाठी भाजप महायुतीकडून शुक्रवारी (दि.6) अधिकृतपणे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. महापौरपदासाठी नितीन जयराम पाटील, तर उपमहापौरपदासाठी प्रमिला रविनाथ पाटील यांनी आपले उमेदवारी अर्ज महापालिका कार्यालयात नगरसचिव नानासाहेब कामठे यांच्याकडे सादर केले. नितीन पाटील यांच्या निवडीमुळे आगरी समाजाचा पहिला महापौर लाभणार असून ही बाब समस्त आगरी समाज आणि पनवेलसाठी ऐतिहासिक ठरली आहे.
पनवेल महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक भाजप महायुतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, माजी खासदार व लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी आणि जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, माजी नगराध्यक्ष जे.एम. म्हात्रे, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली लढवली. या निवडणुकीत भाजपने 55, शिवसेनेने दोन आणि राष्ट्रवादी काँग्रेसने दोन जागांवर विजय मिळवत एकूण 59 जागांसह महापालिकेवर पुन्हा एकदा भाजप महायुतीची भक्कम सत्ता प्रस्थापित केली आहे.
येत्या 10 फेब्रुवारीला महापौर व उपमहापौर पदासाठी निवडणूक होणार आहे. त्या अनुषंगाने शुक्रवारी भाजप महायुतीकडून अर्ज दाखल करण्यात आले. महापौर व उपमहापौरपदासाठी प्रदेशाकडे नावे सुचवण्यात आली. त्यांच्या मान्यतेने ही निवड करण्यात आली असून महापौर व उपमहापौरपदासाठी सव्वा वर्षाचा फॉर्म्युला ठरवण्यात आला आहे.
अर्ज दाखल करताना भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शिवदास कांबळे, पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, शिवसेनेचे महानगरप्रमुख प्रथमेश सोमण यांच्यासह नगरसेवक-नगरसेविका, पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी त्यांनी आणि तत्पूर्वी आमदार प्रशांत ठाकूर, माजी नगराध्यक्ष जे.एम. म्हात्रे यांच्यासह महायुतीमधील नेत्यांनी नितीन पाटील व प्रमिला पाटील यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालकरिता शुभेच्छा दिल्या.
पनवेल तालुक्यातील कासारभाट हे नितीन पाटील यांचे मूळ गाव. त्यांनी यापूर्वी दोन वेळा नगरसेवक म्हणून जबाबदारीने काम केले आहे. सभागृहातील त्यांचा अनुभव, विषयांची सखोल मांडणी आणि विकासाभिमुख दृष्टिकोन यामुळे ते नेहमीच चर्चेत राहिले आहेत. त्यांचा जनसंपर्क व्यापक व मजबूत असून नागरिकांच्या समस्या मार्गी लावण्यासाठी ते सदैव तत्पर असतात. भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सरचिटणीस म्हणून त्यांनी संघटनात्मक पातळीवर उल्लेखनीय कामगिरी केली आहे. पनवेल विधानसभा निवडणुकीत त्यांनी निवडणूक प्रमुख म्हणून केलेले नियोजन, समन्वय आणि नेतृत्व पक्षाच्या यशात महत्त्वाचे ठरले आहे. सामाजिक कार्याची आवड असल्याने ते सुरुवातीपासूनच विविध समाजोपयोगी उपक्रमांमध्ये सक्रिय आहेत. अभिनव मित्र मंडळाचे कार्याध्यक्ष म्हणून त्यांनी अनेक सामाजिक, सांस्कृतिक व सेवाभावी उपक्रम राबवले आहेत. तसेच जाणीव या सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष म्हणून शिक्षण, आरोग्य, आपत्ती व्यवस्थापन आणि गरजू घटकांसाठी विविध उपक्रम यशस्वीपणे राबवत आहेत. त्यांच्या सामाजिक, राजकीय आणि संघटनात्मक कार्याची दखल घेत त्यांच्यावर महापौर पदाची महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
भारतीय जनता पक्षाच्या कळंबोली मंडळाच्या खजिनदार तथा सामाजिक कार्यकर्त्या प्रमिला पाटील यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाच्या जोरावर कळंबोलीच्या राजकारणात स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. श्रेया महिला बचत गट व नंदिनी महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांचे आर्थिक व सामाजिक सबलीकरण करण्याचे भरीव कार्य त्यांनी सातत्याने केले आहे. महिलांच्या प्रश्नांची सखोल जाण आणि तळागाळातील महिलांशी थेट संवाद यामुळे महिलांपर्यंत शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना प्रभावीपणे पोहचविण्यात त्या यशस्वी ठरल्या आहेत.
नुकत्याच पार पडलेल्या महापालिका निवडणुकीत कळंबोलीतील प्रभाग क्रमांक 7, 8 व 9 या तिन्ही प्रभागांमधून भाजप महायुतीचे एकूण 12पैकी 12 उमेदवार विजयी झाले असून हा कळंबोलीतील ऐतिहासिक विजय मानला जात आहे. प्रभाग क्रमांक 7मधून प्रमिला पाटील यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार विद्या गायकवाड (जगदीश गायकवाड यांच्या भगिनी) यांचा दारूण पराभव करत मतदारांचा विश्वास दृढ केला. सामाजिक कार्य, संघटन कौशल्य आणि सर्वसामान्य नागरिकांशी असलेला जवळचा संपर्क यामुळे प्रमिला पाटील यांना उपमहापौरपदी विराजमान होण्याची संधी मिळाली आहे. त्यांचे माहेर आद्यक्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांची पुण्यभूमी असलेल्या शिरढोण गावचे आहे. त्यामुळे शिरढोण गावची लाडकी लेक उपमहापौरपदी विराजमान होत असल्याने संपूर्ण गावात आनंद व अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

नितीन पाटील व प्रमिला पाटील यांना समाजकार्याचा प्रदीर्घ अनुभव आहे. त्याचा फायदा पनवेल महापालिकेला होणार आहे. जनतेचे प्रश्न सोडविण्याबरोबरच जनतेला अपेक्षित असा महापालिकेचा सर्वांगीण विकास ते करतील. प्रदेश कार्यकारिणीने त्यांच्या निवडीबद्दल चांगला निर्णय घेतला. आमदार प्रशांत ठाकूर आणि सर्व नेत्यांचे सर्वांना सोबत घेऊन चालण्याचे धोरण आहे. त्यामुळे भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय महायुतीचा कायम चांगला समन्वय आहे.
-परेश ठाकूर, माजी सभागृह नेते, पनवेल महापालिका

Check Also

स्वार्थी राजकारणामुळेच विवेक पाटील तुरूंगात -माजी सभागृह नेते परेश ठाकूर

उरण ः रामप्रहर वृत्तजनतेचा विकास करण्याऐवजी केवळ स्वतःचा स्वार्थ जपण्याचे राजकारण केल्यामुळेच माजी आमदार विवेक …

Leave a Reply