Breaking News

सीकेटी कॉलेजमध्ये वार्षिक पारितोषिक वितरण आणि स्नेहसंमेलन उत्साहात

पनवेल : रामप्रहर वृत्त
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनीतील स्वायत्त दर्जाप्राप्त चांगू काना ठाकूर (सीकेटी) आर्ट्स, कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण आणि स्नेहसंमेलन दर्पण गुरुवारी (दि. 26) उत्साहात झाले. संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या समारंभास प्रमुख अतिथी म्हणून आयकर विभागाचे मुंबई येथील संयुक्त आयकर आयुक्त महेश लोंढे यांची विशेष उपस्थिती लाभली.
यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवानिमित्त माहितीपट प्रदर्शित करण्यात आला तसेच त्यांच्या जीवनावर महाविद्यालयाच्या इतिहास विभागातर्फे डॉ. रत्नप्रभा म्हात्रे संपादित जिज्ञासा या 28व्या लघु अंकाचे प्रकाशन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमास महापौर नितीन पाटील, उपमहापौर प्रमिला पाटील, संस्थेचे व्हाईस चेअरमन वाय.टी. देशमुख, सचिव डॉ.एस.टी. गडदे, कार्यकारी मंडळाचे सदस्य अ‍ॅड. राहुल घरत आदी उपस्थित होते. प्राचार्य डॉ.एस.के. पाटील यांनी पाहुण्यांचे स्वागत केले व महाविद्यालयाच्या गौरवशाली परंपरेचा आढावा घेतला. प्रमुख पाहुण्यांची ओळख मराठी विभागाच्या प्रा.एन.एच. कडू यांनी करून दिली.
प्रमुख अतिथी महेश लोंढे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना वेळेचे महत्त्व अधोरेखित केले. मोबाईल, टीव्ही आणि इंटरनेट या साधनांचा संयमाने वापर करण्याचे आवाहन त्यांनी केले. केवळ जिंकण्यापेक्षा स्पर्धेत सहभाग महत्त्वाचा असून शैक्षणिक अभ्यासाबरोबरच सहअभ्यासक्रम आणि स्पर्धा परीक्षांमध्येही सहभागी होण्याचा सल्ला त्यांनी दिला तसेच उत्तम वाचन, वेळेचा सदुपयोग आणि चांगली संगत हीच आयुष्यातील यशाची गुरुकिल्ली असल्याचे नमूद केले.
अध्यक्षीय भाषणात लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी विद्यार्थ्यांच्या शिस्तीचे, संयमाचे आणि त्यांच्या घवघवीत यशाचे कौतुक केले. त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या यशामागे पालकांचेही योगदान मोलाचे असल्याचे सांगत त्यांनी सर्वांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
महाविद्यालयातील क्रीडा, कला, संशोधन, सेवा क्षेत्रातील ज्या विद्यार्थ्यांनी विभागीय, विद्यापीठीय, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर देदीप्यमान यश प्राप्त केले अशा विद्यार्थ्यांचा आणि महाविद्यालयीन स्पर्धेत विजेत्या विद्यार्थ्यांचा सत्कार विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. महाविद्यालयातील शैक्षणिक पात्रता वृद्धिंगत करणारे प्राध्यापक वर्ग तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनासुद्धा सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ.आर. व्ही. येवले, प्रा.ए.व्ही. पाटील आणि प्रा.डॉ. गीतिका तंवर यांनी केलेे.
दुसर्‍या सत्रात महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा नृत्य, गायन आणि अभिनय यांचा कला संगम असणारा दर्पण 2026 या शीर्षकाखालील वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या दिमाखात साजरे झाले. यासाठी प्रमुख अतिथी हिंदी बिगबॉस फेम प्रसिद्ध अभिनेता प्रणीत मोरे यांची विशेष उपस्थिती लाभली. त्याचबरोबर प्राचार्य डॉ.एस.के. पाटील, कलाशाखेचे प्रमुख डॉ.बी.एस. पाटील, वाणिज्यशाखेचे प्रमुख डॉ.एस.बी. यादव, विज्ञानशाखेच्या प्रमुख डॉ.जे.एस. ठाकूर, आयक्यूएसी विभागाचे समन्वयक डॉ.बी. डी. आघाव, कार्यालयीन अधीक्षक पी.एस. म्हात्रे, महिला विकास विभागाच्या प्रमुख डॉ.आर.डी. म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सांस्कृतिक विभागाचे समन्वयक गणेश जगताप, सांस्कृतिक विभागाच्या प्रमुख डॉ. गीतिका तंवर आणि विद्यार्थी परिषद आणि विद्यार्थी कल्याण विभागाच्या समन्वयक डॉ.एस. एन. परकाळे व सदस्यांनी परिश्रम घेतले.

Check Also

रायगड जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत ओमकार वेश्वी, कर्नाळा स्पोर्टस् अकॅडमी संघ विजेते

पनवेल : रामप्रहर वृत्तगोरगरिबांचे आधारस्तंभ, दानशूर व्यक्तिमत्व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी …

Leave a Reply