खारघर ः रामप्रहर वृत्त
श्री परशुराम जयंतीचे औचित्य साधून खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये रविवारी (दि.१९) भव्य रक्तदान महाशिबिराचे आयोजन करण्यात आले होते. टाटा मेमोरियल हॉस्पिटलच्या सहकार्याने पार पडलेल्या या शिबिराला स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या सामाजिक उपक्रमाला भाजपचे प्रदेश सचिव आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट दिली. केवळ भेटच न देता, त्यांनी स्वतः रक्तदान करून समाजासमोर एक आदर्श निर्माण केला. यावेळी त्यांनी रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान असून अशा शिबिरांच्या माध्यमातून गरजू रुग्णांना जीवदान मिळण्यास मोठी मदत होते, असे प्रतिपादन केले.
सकाळपासूनच या शिबिरात नागरिकांची मोठी गर्दी पहायला मिळाली. अनेक तरुण आणि ज्येष्ठ नागरिकांनी सामाजिक बांधिलकी जपत उत्साहाने रक्तदान केले. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते रक्तदान करणाऱ्या नागरिकांना प्रमाणपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
या शिबिरास महापौर नितीन पाटील, नगरसेवक रामदास शेवाळे, प्रवीण पाटील, सुमित झुंजारराव, रूपेश नागवेकर यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. टाटा मेमोरियल हॉस्पिटलच्या रक्तपेढीमार्फत संकलित करण्यात आलेले या शिबिरातील रक्त कॅन्सरसारख्या गंभीर आजारांशी लढणाऱ्या रुग्णांच्या उपचारासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
Check Also
संत रोहिदास महाराज जयंती भाजपतर्फे विविध कार्यक्रमांनी होणार साजरी
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत नियोजन बैठक पनवेल : रामप्रहर वृत्तसंत रोहिदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त …
RamPrahar – The Panvel Daily Paper