वेलिंग्टन : वृत्तसंस्था
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी मालिकेला अखेरीस सुरुवात झाली आहे. नवीन वर्षातील भारतीय संघाचा हा पहिला कसोटी सामना असल्यामुळे या सामन्यात विजयी सुरुवात करण्याचे ध्येय भारतीय संघासमोर असणार आहे. वेलिंग्टनच्या पहिल्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. न्यूझीलंडचा सर्वांत अनुभवी खेळाडू रॉस टेलरने या सामन्यात मैदानावर पाऊल ठेवताच शतकाची नोंद केली आहे. क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत 100 सामने खेळणारा रॉस टेलर हा पहिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू ठरलाय. याआधी कोणत्याही खेळाडूला अशी कामगिरी जमली नाही. दरम्यान, भारतीय संघात या सामन्यासाठी दोन महत्त्वाचे बदल करण्यात आले. रोहित शर्माच्या जागेवर मुंबईकर पृथ्वी शॉला संधी देण्यात आली, मात्र 16 धावा काढत तो टीम साऊदीच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत होऊन माघारी परतला. याव्यतिरिक्त वृद्धिमान साहाऐवजी भारतीय संघ व्यवस्थापनाने ऋषभ पंतला संधी दिली आहे.