साऊथच्या गीत संगीत नृत्याचा तडका एकदम भारी
आपण राजकारणाचे बाजूला ठेवू. ते आपल्याला समजेपर्यंत चाल वा खेळी बदललेली असते. थलापती विजय तमिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाला त्या शपथविधीला त्याची प्रेयसी त्रिशा कृष्णनची उपस्थित जास्त लक्षवेधक ठरली हे आपल्या लक्षात येईपर्यंत या दोघांची भूमिका असलेल्या ए.एम. रथनम निर्मित आणि धरानी दिग्दर्शित ‘घिल्ली’ (2004) या तमिळ चित्रपटातील तडतडीत गाणे सोशल मीडियावर इतकं आणि असं व्हायरल झालं की ऐकून ऐकून अनेकांना जागच्या जागी नाचावेसे वाटलं असेल, जास्त ऐकल्यावर ते आवडतेही झाले असेल, वाढदिवसाच्या पार्टीपासून क्लब पब डान्सपर्यंत ते पोहचलेही, त्यावर अनेकांचे रिलही बनले आणि भरपूर लाईक्सही मिळाले, लोकप्रियता याला म्हणतात, ती कधी आणि कशी, कुठे मिळेल हे सांगता येत नाही हाच डिजिटल युगाचा फंडा आहे. बरं त्या गाण्याचे तमिळ बोल वा शब्द समजत नाहीत, समजून घेण्याचा प्रयत्न करेपर्यंत ते संपते. या गाण्याचा वेगच तसा आहे.
सुरुवातीला त्या नृत्यातील विजय आणि त्रिशा यांच्या जमलेल्या केमिस्ट्रीचे कौतुक वाटलं. अभिनय करता करता ते एकमेकांकडे आकर्षित झाले आणि विजयच्या राजकारणातील यशात त्याच्या पत्नी आणि दोन मुलांची नाही तर या प्रेयसीची चर्चा रंगली. हे गाणे पडद्यावर आले तेव्हा विजय तीस वर्षांचा तर त्रिशा बावीस वर्षाची होती. आज विजय एकावन्न वर्षांचा आणि त्रिशा त्रेचाळीस वर्षांची आहे. हे गाणे मात्र चिरतरुण आहे.
‘घिल्ली’ चित्रपटात विजयने कब्बडीपटू वेलूची भूमिका साकारलीय, तो एका स्पर्धेसाठी मदुराई येथे गेला असता गावातील गुंड मुथुपडी (प्रकाशराज) याच्या तावडीतून तो धनलक्ष्मी (त्रिशा कृष्णन) हिला वाचवतो. हा मुथु धनलक्ष्मी हिच्याशी लग्न करण्याच्या प्रयत्नात असतो. त्याचा हा हेतू वेलू हाणून पाडतो, त्यात धनलक्ष्मी त्याच्या प्रेमात पडते आणि हे
अप्पाडी पोडू (म्हणजे काय?) गाणे ते गातात, मनसोक्त , मनमुराद आनंद घेत घेत बेभान बेफाम नाचतात. संगीत विद्यासागर याचे आहे. भारी ठेका पकडला आहे. मास अपील आहे. अशी गाणी समाजातील खालच्या माणसापर्यंत पोहोचतात. लाऊडस्पिकरच्या माध्यमातून सगळे सण साजरे करतात.
दक्षिणेकडील ठसा आणि ठेका असलेल्या गाण्याची अन्यभाषिकाना भुरळ पडणे नवीन नाही. चित्रपट संस्कृतीतील ही एक वेगळी गोष्ट. चित्रपट अभ्यासात ही हवी. खरंतर संगीताला जात, भाषा, धर्म, प्रांत यांच्या सीमा अथवा मर्यादा नसतात. ते वाहते असते. ते कानाला सुखावणारं ठरले की भाषेची अडचण येत नाही वा येऊ नये. आजच्या ग्लोबल युगातील डिजिटल पिढीसमोर तर जगभरातील अनेक गोष्टी आहेत, त्यातून एक प्रकारची सांस्कृतिक मिसळणे अथवा घुसळण सुरू आहे, अगदी एखाद्या युवकाला युरोपियन देशातील म्युझिकल ग्रुप माहित्येय, नवीन गायक तो ऐकतो. तो नव्याचा शोध घेत घेत ऐकतोय.
हिंदी चित्रपटसृष्टीवर साऊथच्या संगीताचा फंडा ही गोष्ट खूपच जुनी. एस.रामनाथन दिग्दर्शित ‘दो फूल’ (1973) या चित्रपटात मेहमूदच्या दुहेरी भूमिकेतील एक साऊथ इंडियन असतो आणि त्याची नायिका रमा प्रभा. त्यांच्यावरचे समुद्र किनारी फक्कडबाज प्रेम गीताचे बोल आहेत, मुत्तुकोडी कवाडी हडा. याचा अर्थ असा होतो की, समुद्रातून तूला मी हिरे माणके आणून देईन… गाण्याचा मुखडा तमिळ भाषेत पण गाणं हिंदीत असा भन्नाट प्रकार. आजच्या भाषेत भन्नाट कॉकटेल. हे गाणे आणि पिक्चर सुपर डुपर हिट ठरले. रसिकांची पसंती हे मोठेच देणं.
यानंतर एक तर साऊथचे चित्रपट हिंदीत डब करुन येताना तिकडचं संगीत आणि त्यावर हिंदी बोल आले. ‘हमसे है मुकाबला’ या मसालेदार मनोरंजक चित्रपटात प्रभू दूवाचे मुक्काला… ओ लैला गाण्यावरचे भन्नाट नृत्य म्हणजे जणू इलेक्ट्रिक शॉक! प्रभू देवाच्या अंगात स्प्रीग बसवली आहे की काय असे वाटावे. संपूर्णपणे झोकून देऊन नाचानाच काय असते ती त्या गाण्यात दिसते. कमल हसनचीही तीच खासियत. ‘हिन्दुस्तानी’ (तमिळ चित्रपटाचे नाव ‘इंडियन’) मधील मनिषा कोईरालासोबतचे टेलिफोन बूथ से गाणे असेच एकदम कडक. ‘जिन्स’ (1998) हा मूळ तमिळ चित्रपट हिंदीत डब करुन येताना तिकडचं प्रशांत आणि ऐश्वर्या राय यांच्यावरचे अम्बे अम्बे हे गाणे मुळ मुखड्यासह लोकप्रिय झाले. नव्वदच्या दशकात चित्रपट रसिकांची नवीन पिढी होती. जागतिकीकरण आणि खुली अर्थव्यवस्था यामुळे हळूहळू जगणं बदलत होते. त्यातला एक भाग म्हणजे चित्रपट संगीतातील नवीन प्रवाह आवडू लागले होते. त्यात एक महत्त्वाचा भाग म्हणजे एमटीव्ही संगीत संस्कृती रूजत गेली.राजकुमार संतोषी दिग्दर्शित ‘पुकार’ (2000)मध्ये के सरा सरा गाण्यावर माधुरी दीक्षितने प्रभू देवासोबत तितकेच भारी नृत्य साकारण्याची हौस मौज पूर्ण केली. माधुरी दीक्षित कोणत्याही प्रकारच्या नृत्यात पारंगत आणि त्यासाठी तितकेच भरपूर परिश्रम घेणारी.
दक्षिणेकडील संगीतकार इलया राजा, ए. आर. रेहमान, आर. आर. करीम यांनी हिंदीत येताना आपल्या मूळ चाली हिंदीत आणल्या. ती गाणी साऊथच्या चित्रपटाच्या स्वरुपाप्रमाणे होती. साऊथच्या अनेक चित्रपटांत नायक नायिकेच्या भोवती नृत्य कलाकारांची मोठी टोळी दिसेल. (पुष्पा द राईज चित्रपटात ते सामी सामी, श्रीवल्ली गाण्यात दिसले) आणि मग गाणेही त्याच लयीतील असते. चित्रपटातील गीत संगीत नृत्याची बहारदार फोडणी हे तिकडच्या चित्रपटाचे वैशिष्ट्य (चित्रपटात गाणीच नसतील तर बजेट वाचेल अशी कंजुषी अजिबात नाही. प्रेक्षकांना भरभरून मनोरंजन देताना गीत संगीत नृत्याची बहारदार फोडणी असावी असा तिकडचा दृष्टीकोन.)
आपल्या देशात उपग्रह वाहिन्यांचे जाळे वाढले, मग यू ट्यूब पाहणं वाढलं आणि साऊथच्या कन्नड, तेलुगू, तमिळ आणि मल्याळम भाषेतील गाणी मूळ भाषेत ऐकण्याची एक वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती निर्माण झाली. गाणं ऐकायला आवडतेय, पहायलाही छान आहे असं वाटू लागलं आणि अशी अनेक गाणी मराठी व हिंदी चित्रपट शौकीनाना आवडू लागली. साऊथची भाषा भलेही समजत नसेल, कन्नड कोणती आणि तमिळ कोणती हे लक्षात येत नसेल, पण गाण्याचा ठेका आवडतोय, तितकं पुरेसे आहे. हे बदलत्या काळाचे भान आहे.
अशी काही भाषेचे बंधन ओलांडूनही ऐकली गेलीली काही गाणी, गीत गोविन्दम (चित्रपट वचिडम्मा. पडद्यावर हे गाणे विजय देवरकोडा आणि रश्मिका मन्दाना), परायुवान (चित्रपट इश्क, पडद्यावर हे गाणे शेन आणि अन्ना), वासिगारा (चित्रपट मिन्नाल. पडद्यावर हे गाणे माधवन आणि रीमा सेन), अल्लापोरन तमिजान (चित्रपट मेर्सल), डॅडी मम्मी (विल्लू), वासीगारा (मिन्नाले) वगैरे वगैरे अनेक. ठेका आवडला की गाणं पुन्हा एकदा ऐकावेसे वाटतं हा एक अलिखित नियम आहे, तो अशी गाणी लोकप्रिय करतो. म्हटलं तर हे एक प्रकारचे सांस्कृतिक आक्रमण आहे. एक सरमिसळ आहे, पण ती रोखता येणारी नाही. जुन्या पिढीतील चित्रपट संगीत शौकीनानां हे सगळे अजिबात पटणारे वा आवडणारे नाही. साधारण 1975 सालापर्यंतचे चित्रपट संगीत हेच खरे संगीत. जे. ओम प्रकाश निर्मित आणि गुलजार दिग्दर्शित ‘आन्धी’पर्यंतचे संगीत श्रवणीय आहे, रमेश सिप्पी दिग्दर्शित ‘शोले’पासून चित्रपट संगीतात गोंगाट आला असे मानणारा मोठा वर्ग आहे.
ते काहीही असले तरी जग अधिकाधिक जवळ येत जाताना त्यात विविध भाषांतील गीत संगीत नृत्याची फोडणी, जोडणी येत येत गेली. फक्त आणि फक्त त्याला कधी काही निमित्त होती. अप्पाडी पोडू असेच एक जबरदस्त सांस्कृतिक आणि माध्यम आक्रमण आहे….
-दिलीप ठाकूर, चित्रपट समीक्षक
RamPrahar – The Panvel Daily Paper