Breaking News

पनवेलमधील कलाकार भविष्यात अभिनय क्षेत्रात चमकतील -लोकनेते रामशेठ ठाकूर

प्रशिक्षण शिबिराचा शानदार समारोप

पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेलचे नाव कला, क्रीडा क्षेत्रात गाजत आहे. महापालिकेचा विस्तार नागरिकांच्या जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात झेप घेण्याच्या दृष्टीने सुरू आहे. सांस्कृतिक क्षेत्रातही पनवेलचे नाव गाजविण्यासाठी शिबिराच्या माध्यमातून महापालिका आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद प्रयत्न करते आहे. या प्रशिक्षणार्थींचा अभिनय पाहिल्यावर भविष्यात हे मोठे कलाकार होऊन अभिनय क्षेत्रात चमकतील याची चुणूक त्यांच्या सादरीकरणातून दिसल्याचे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले.
पनवेल महापालिका आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने पनवेल, खारघर, कळंबोली येथे ११ मे ते १९ मे अभिनय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचा मंगळवारी (दि.१९) आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात समारोप झाला. त्यावेळी मार्गदर्शन करताना लोकनेते रामशेठ ठाकूर बोलत होते.
समारोप समारंभास महापौर नितीन पाटील, उपमहापौर प्रमिला पाटील, सभागृह नेते ॲड. प्रकाश बिनेदार, स्थायी समिती सभापती बबन मुकादम, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखेचे उपाध्यक्ष तथा नगरसेवक परेश ठाकूर, बाल रंगभूमी परिषदेच्या राज्य अध्यक्ष नीलम शिर्के-सामंत, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, नियामक मंडळ सदस्य प्रा. डॉ. संजय पाटील-देवळाणकर, भाजप उत्तर रायगड जिल्ह्याध्यक्ष अविनाश कोळी, नगरसेवक सुमित झुंजारराव, नगरसेविका डॉ. अस्मिता घरत यांच्यासह तिन्ही ठिकाणांचे प्रशिक्षणार्थी, त्यांचे पालक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखेचे उपाध्यक्ष तथा नगरसेवक परेश ठाकूर म्हणाले की, आजचे युग हे स्पर्धेचे युग आहे. त्यामुळे संधी कमी आणि स्पर्धक जास्त असतात अशा वेळी स्वत:ला चांगल्या प्रकारे अभिव्यक्त करणाऱ्याला ती संधी मिळते. ते शिक्षण या अभिनय शिबिराच्या माध्यमातून दिले जाते. व्यक्तिमत्व घडविण्यासाठी ही अभिनय प्रशिक्षणे निश्चित उपयोगी पडणार आहेत. त्यासाठी महापालिकेने अशी शिबिरे नेहमी भरवावी, असेही त्यांनी सांगितले.
बाल रंगभूमी परिषदेच्या राज्य अध्यक्ष नीलम शिर्के-सामंत म्हणाल्या की, प्रत्येकजण आपल्या आपल्या क्षेत्रात अभिनयच करत असतो. प्रत्येकामध्ये कलावंत असतो व प्रत्येकाने तो जिवंत ठेवायचा असतो. अभिनयाला वय नसते. त्यामुळे प्रत्येकाने ही कला जोपासायला हवी. पनवेलला लवकरच बालरंगभूमीची शाखा सुरू करण्याबाबतचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
महापौर नितीन पाटील यांनी आभार मानताना सांगितले की, कोणत्याही शहराची ओळख ही तिथल्या इन्फ्रास्ट्रक्चरमुळे होत नाही, तर त्या शहराची सांस्कृतिक चळवळ कशी आहे, सांस्कृतिक वारसा जपला जातो आहे की नाही यावर ठरत असते. पालिकेच्या या नाट्यगृहामध्ये होणाऱ्या या अभिनय शिबिरांच्या माध्यमातून हा वारसा जोपासला जात असल्याचे त्यांनी नमूद केले.
य ावेळी पनवेल, खारघर, कळंबोली येथील अभिनय प्रशिक्षण शिबिराच्या प्रशिक्षणार्थींनी मान्यवरांच्या उपस्थितीत सादरीकरण केले. या सादरीकरणाला मान्यवरांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात शाबासकी दिली तसेच मान्यवरांच्या हस्ते प्रशिक्षणार्थींना प्रशस्तीपत्राचे वाटप करण्यात आले.
याबरोबरच या नाट्यशिबिरासाठी मार्गदर्शन केलेले प्रशिक्षक अशोक केंद्रे, संकेत खेडकर, विद्यानाथ सुर्वे, मनोज चिताडे, विक्रांत धीवरे, अमित गाडे, हरीश जाधव यांचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक महापालिकेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. राजू पाटोदकर यांनी केले. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे कार्यवाह शामनाथ पुंडे, अभिषेक पटवर्धन, गणेश जगताप, स्मिता गांधी, कविता ठाकूर उपस्थित होते. प्रशिणार्थींना मार्गदर्शनासाठी नाट्य निर्मितीसंदर्भातील विविध पुस्तकांचे वाटप यावेळी करण्यात आले.

Check Also

आप्पाडी पोडू…पोडू

साऊथच्या गीत संगीत नृत्याचा तडका एकदम भारी आपण राजकारणाचे बाजूला ठेवू. ते आपल्याला समजेपर्यंत चाल …

Leave a Reply