Breaking News

मुझे कुछ कहना है @25 वर्षे

कपूर आणि कपूर पुन्हा कपूर आणि कपूर

अधूनमधून स्टारपुत्राचे चित्रपट पडद्यावर येण्याचे दिवस असतात. लाट असते म्हणा ना? ऐंशीच्या दशकाच्या पूर्वार्धात राजेंद्रकुमारचा मुलगा कुमार गौरव (लव्ह स्टोरी), सुनील दत्तचा पुत्र संजय दत्त (रॉकी), धर्मेंद्रचा मुलगा सनी देओल (बेताब), नूतनचा मुलगा मोहनीश बहेल (तेरी बाहो मे), देव आनंदचा मुलगा सुनील आनंद (आनंद और आनंद), राज कपूरचा मुलगा राजीव कपूर (एक जान है हम), मनोजकुमारचा मुलगा कुणाल (क्रांती) वगैरे वगैरे. त्यांची पुढची वाटचाल कशी झाली, चढ उतार कसे, त्यांचे प्रगती पुस्तक कसे आहे हे प्रत्येक चित्रपटासह स्पष्ट होत होत गेले… साप सिडीचा खेळ असतो हा.
नव्वदच्या दशकाच्या सुरुवातीलाही अशीच स्टार पुत्र लाट आली. तनुजाची मुलगी काजोल, रणधीर कपूर आणि बबिता यांची मुलगी करिश्मा, धर्मेंद्रचा मुलगा बॉबी देओल, राजेश खन्ना आणि डिंपल यांची मुलगी ट्विंकल, शर्मिला टागोरचा मुलगा सैफ अली खान, विनोद खन्नाचा पुत्र अक्षय खन्ना आणि राहुल खन्ना, राजकुमारचा मुलगा पुरू राजकुमार, माला सिन्हाची मुलगी प्रतिभा असे अनेक स्टार पुत्र आले. एक प्रकारे हे वारसदार असतात, पण स्पर्धेत टिकून राहण्यासाठी गुणवत्ता, योग्य संधी, मेहनत आणि चित्रपट सुपर डुपर हिटचे सातत्य हवे. एकेक चित्रपट करत करत नवीन गोष्टी शिकण्याची गरज असते. जो शिकतो तो तरतो.
धर्मेंद्र निर्मित आणि शेखर कपूर दिग्दर्शित ‘बरसात’ चा जंगी मुहूर्त बॉबी देओल आणि करिश्मा कपूरवर झाला, पण काही कारणाने चित्रीकरण सुरू होईना तोपर्यंत शेखर कपूरने चित्रपट सोडला, याच गडबडीत बबिताने आपल्या कन्येला करिश्माला अर्थात ‌‘लोलो‌’ला या चित्रपटातून काढून हरिशसोबतचा ‘प्रेम कैदी’ दिला, तर ‘बरसात’ चे दिग्दर्शन राजकुमार संतोषीकडे येताना बॉबी देओलची नायिका म्हणून ट्विंकल खन्ना आली.
नवीन दशकाच्या सुरुवातीला आणखी एकदा स्टारपुत्र लाट आली. एव्हाना हिंदी चित्रपट बराच पुढे गेला होता. अधिक चकाचक झाला होता. चित्रपटाची पूर्वप्रसिद्धी अधिक महत्त्वाची नि खर्चिक गोष्ट होत चालली होती. राकेश रोशनचा पुत्र ऋतिक रोशन, अमिताभ बच्चनचा पुत्र अभिषेक बच्चन, रणधीर कपूर आणि बबिता यांची कन्या करिना कपूर, जितेंद्रचा पुत्र तुषार कपूर, शत्रुघ्न सिन्हाची मुलगी सोनाक्षी सिन्हा, ऋषि कपूर आणि नीतू सिंग यांचा पुत्र रणबीर कपूर, अनिल कपूरची मुलगी सोनम कपूर वगैरे वगैरे अनेक. काहीसे हायफाय. जास्त इंग्रजी बोलणारे.
स्टारपुत्रांना लहानपणापासूनच आपल्या पालकांचे पडद्यावरचे रूपडे, चित्रपटसृष्टीतील स्टारडम, खरे खोटे नातेसंबंध, घरातील वावर, यशापयशातील मानसिक भावनिक चढउतार माहीत असतात. चित्रपट कलाकाराचे आयुष्य वरकरणी सुखासीन, ग्लॅमरस असते. ते टिकवण्यासाठी, वाढवण्यासाठी सतत प्रयत्न करावा लागतो. अशा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष अनेक गोष्टी असतात.
आणि अशाच पार्श्वभूमीवर तुषार कपूर आणि करिना कपूर या कपूर आणि कपूर जोडीचा वासू भगनानी निर्मित आणि सतिश कौशिक दिग्दर्शित ‘मुझे कुछ कहना है’ पडद्यावर आला. मुंबईत हा चित्रपट 24 मे 2001 रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या प्रदर्शनास पंचवीस वर्षे पूर्ण होत आहेत. कधी सरकला हा काळ? काही समजलं?
करिना कपूरने, खरं तर तिची आई बबिताने. तिच तेव्हा आपल्या दोन्ही मुलींच्या कारकिर्दीची आखणी करत असे. याबाबत ती ‘कपूर मदर’, बबिताच्या चाणाक्ष डावपेचाच करिनाला राकेश रोशन दिग्दर्शित ‘कहो ना प्यार है ‘(2000) मध्ये ऋतिक रोशनची नायिका म्हणून रूपेरी पदार्पणाची संधी मिळाली. महालक्ष्मी येथील फेमस स्टुडिओत चित्रीकरणाचे पहिलं सत्रही पार पडले. तशी ‘अच्छी खबर’ सगळीकडे प्रसिद्ध होत असतानाच ‘कहानी मे टर्न आणि ट्विस्ट’ आला. बबिताने आपल्या कन्येला अधिक पॉवरफुल अशी रूपेरी पदार्पणाची संधी मिळावी म्हणून राकेश रोशनला सांगून करिनाला ‘कहो ना प्यार है’ सोडायला भाग पाडले आणि जे. पी. दत्ता दिग्दर्शित ‘रिफ्यूजी’ (2000)मध्ये अभिषेक बच्चनची नायिका केले. मोठ्या सेलिब्रिटीजचा मुलगाही मोठाच असतो हे समीकरण आहे हो. ‌‘कहो ना प्यार है‌’मध्ये अमिषा पटेल आली आणि ही प्रेमकथा सुपर डुपर हिटही ठरली. बबिता एवढ्यावरच थांबली असती तर ती महत्वाकांक्षी नाही असा उगाच गैरसमज झाला असता, आपल्या बेबोला अर्थातच करिना कपूरला आणखी चित्रपटात फिट्ट केले आणि त्यातच एक चित्रपट, मुझे कुछ कहना है.
बबिताने आपला एकेकाळचा जम्पिग जॅक हिरो जितेंद्र याचा पुत्र तुषार कपूर यांच्यासोबत बेबोला नायिका म्हणून उभं करणं हा तिच्या एकूणच डावपेचांचा एक भागच. चित्रपट अभ्यासात हेदेखील यायला हवे का? पडद्यामागे अनेक गोष्टी घडत बिघडत असतात.
मला आठवतंय, मुझे कुछ कहना है पूर्णतेच्या आणि आपला पुत्र तुषार याच्या रूपेरी पडद्यावरील पदार्पणाच्या निमित्ताने मुंबईतील आम्हा काही निवडक सिनेपत्रकारांना आपल्या जुहू येथील गुलमोहर सोसायटीतील कृष्णा बंगल्यावर एक अतिशय जोरदार शोरदार ओली पार्टी दिली. कॉकटेल फंडा. जितेंद्र हा मुळचा आमच्या गिरगावातील रामचंद्र बिल्डिंगचा (नंतरचे नाव सेवा सदन) रहिवाशी. तेथे राहत असतानाच तो चित्रपटसृष्टीत आला. मिळालेल्या लहान मोठ्या संधीचा सदुपयोग करत करत स्टार झाला. नावारूपास आल्यावर तो वांद्रे येथील पाली हिलवरील निभाना या तेव्हा नवीन असलेल्या भव्य इमारतीत राह्यला गेला. (याच इमारतीत प्रेम चोप्रा, रणजीत, तसेच विनोद मेहरा आणि असरानी राहत होते. रणजीत काही वर्षांनी जुहूला बंगल्यात राहायला गेला). जितेंद्रने टॉपवर असताना निभाना इमारतीतून जुहूला येताना हा बंगला बांधला. काही वर्षांनी याच परिसरात आणखी एक बंगला उभारला. आणि या पार्टीला आम्हा प्रत्येक सिनेपत्रकाराचे जितेंद्रने अगत्याने स्वागत केले. माझं तर मराठीत केले. आपण सेलिब्रेटीज आहोत तेव्हा आपण आपला स्टारडम जपला पाहिजे असे न वागता आपण यजमान असून पाहुण्यांचे यथोचित स्वागत करायला हवे याचे भान त्याने ठेवले, हेच तर जितेंद्र गिरगावात लहानाचा मोठा झाला तरी आपल्यावरचे संस्कार विसरला नाही हेच जणू दाखवून देत होता. चित्रपटसृष्टीतील माझ्या भटकंतीत असे लाईव्ह अनुभव विलक्षण सुख देणारे.
… या बंगल्याच्या तिसऱ्या मजल्यावरील प्रशस्त हॉलमध्ये ‌’मुझे कुछ कहना है‌’ची गाणी दाखवायची हालचाल सुरू असतानाच बबिता आणि बेबोने अतिशय दिलखुलास एन्ट्री घेतली. या कपूरना देखणं दिसण्यासाठी वेगळे करावे लागत नाहीत, हे त्यांना प्रत्यक्षात पाहताच क्षणी लक्षात येते (मिडियात असल्यानेच असे अनेक सुखद योग मला अनेक वर्षे येत आहेत.) याक्षणी जितेंद्र आणि बबिता जोडीचे एकेक चित्रपट डोळ्यासमोर यायला लागले. एक जणू फ्लॅशबॅक. रविकांत नगाईच दिग्दर्शित फर्ज (1967) सुपर डुपर हिट होताच ही जोडी जमली. हिट पिक्चरचीच जोडीला करारबद्ध करण्यात निर्मिता, दिग्दर्शक आणि वितरक यांना विशेष रस असल्याचे ते दिवस. त्यानंतरचा कुंदनकुमार दिग्दर्शित ‘औलाद’ (1968) ही सुपर डुपर हिट. असं यश या जोडीच्या एस.डी. नारंग दिग्दर्शित अनमोल मोती (1969), तपी चाणक्य दिग्दर्शित ‘बिखरे मोती’ (1971), विजय भट्ट दिग्दर्शित ‘बनफूल’ (1971), एस. एम. अब्बास दिग्दर्शित ‘एक हसिना दो दीवाने’ (1972) या चित्रपटांना मिळाले नाही. दरम्यानच्या काळात बबिता कपूर खानदानाची सून बनली आणि तिने चित्रपटात भूमिका साकारणे थांबवले तरी ती चित्रपटसृष्टीत वावरत होती. (फर्ज आणि बनफूल मी गल्ली चित्रपटात गोणपाटावर बसून एन्जॉय केले हे यावेळी डोळ्यासमोर आले. तेव्हा, त्या वयात चुकूनही कधी मनात आले नाही की एके दिवशी मी जितेंद्रच्या बंगल्यावर अशा पद्धतीने पार्टीला जाईन. ही माझ्या अतिशय आठवणीत राहील अशी फिल्मी पार्टी.)
मुझे कुछ कहना है एक प्रेमपट हे नावावरून दिसतेय. राज कपूरच्या ‘बॉबी’ या सर्वकालीन सुपरहिट युथफुल चित्रपटातील गाण्याचा मुखडा. त्यावरून रुमी जाफरीने पटकथा लिहिली. करण शर्मा (तुषार कपूर) आणि पूजा सक्सेना (करिना कपूर) यांच्यातील ही दिलखुलास मनमोकळ्या वातावरणातील गीत संगीताने नटलेली प्रेमकथा. जोडीला अमरीश पुरी, रिंकी खन्ना (ही राजेश खन्ना आणि डिंपलची मुलगी) तसेच दलिप ताहिल, हिमानी शिवपुरी, ब्रिजेश हिरजे, दिनेश हिंगू, वगैरे वगैरे. अन्नू मलिकच्या संगीतातील रब्बा मेरे रब्बा, मैने कोई जादू, दुपट्टा अशी उडती गाणी त्या काळात लोकप्रिय झाली. नंतर कधीतरी आठवत.
या चित्रपटाच्या प्रदर्शनास पंचवीस वर्षे झाली, पण ती इतकी आणि अशी भरभर गेली की हा (आणि त्या काळातील अनेक चित्रपट) हे इतके जुने झाले आहेत असे वाटत नाही. याचा अर्थ ते आजही तरुण आहेत असेही नाही. जुने चित्रपट म्हटल्यावर साधारण सत्तरच्या दशकापर्यंतचे चित्रपट गणावेसे वाटतात…. मुझे यह कहना है.

  • दिलीप ठाकूर, चित्रपट समीक्षक

Check Also

कान्स चित्रपट महोत्सव

कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात देश विदेशातील अनेक भाषेतील चित्रपट दाखविण्यात आले. त्यातून जगभरातील अनेक देशांतील …

Leave a Reply