नेहरूंना मागे टाकत सलग सर्वाधिक काळ पंतप्रधानपदी
पनवेल ः रामप्रहर वृत्त
भारतीय लोकशाहीच्या इतिहासात १० जून २०२६ हा दिवस ऐतिहासिक ठरला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग सर्वाधिक काळ लोकशाही पद्धतीने निवडून आलेले पंतप्रधान म्हणून नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. त्यांनी देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या तब्बल सहा दशकांहून अधिक काळ टिकून असलेल्या विक्रमाला मागे टाकले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग तिसऱ्यांदा देशाच्या पंतप्रधानपदाची धुरा सांभाळत अनेक ऐतिहासिक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. मे २०१४ मध्ये पंतप्रधान म्हणून पहिल्यांदा सत्तेवर आल्यापासून त्यांनी देशाच्या सर्वोच्च पदावर सलग ४,३९९ दिवसांचा टप्पा पूर्ण केला आहे, ज्यामुळे ते सलग सर्वाधिक काळ सेवा देणारे भारताचे पहिले लोकनियुक्त पंतप्रधान बनले आहेत. या गौरवपूर्ण आणि ऐतिहासिक कामगिरीबद्दल बुधवारी (दि. १०) पनवेलमधील विरूपाक्ष मंदिरात महाआरती करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दीर्घायुष्याची सामूहिक प्रार्थना करण्यात आली.
भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सचिव आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमास महापौर नितीन पाटील, ज्येष्ठ नेते श्रीनंद पटवर्धन, महिला व बालकल्याण सभापती ममता म्हात्रे, पनवेल महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, जिल्हा उपाध्यक्ष गणेश कडू, मयुरेश नेतकर, नगरसेवक सुमित झुंझारराव, अजय बहिरा, नगरसेविका रुचिता लोंढे, प्रिती जॉर्ज, माजी नगरसेवक प्रभाकर बहिरा, सुनील बहिरा, सुहासिनी शिवणेकर, अमित ओझे, गुरुनाथ लोंढे, केदार भगत, रूपेश नागवेकर, उपेंद्र मराठे, विनायक मुंबईकर, अभिषेक पटवर्धन, युवा मोर्चा शहराध्यक्ष हिमेश बहिरा यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
सलग सर्वाधिक काळ पदावर राहणाऱ्या निवडून आलेल्या पंतप्रधानांच्या बाबतीत त्यांनी भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचा विक्रम मागे टाकला आहे. २०१४, २०१९ आणि २०२४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये सलग विजय मिळवून त्यांनी सलग तीन वेळा पूर्ण कार्यकाळ पूर्ण करण्याच्या दिशेने आगेकूच केली आहे. गेल्या काही वर्षांत देशात अनेक पायाभूत सुविधा, डिजिटल क्रांती आणि कल्याणकारी योजनांचा विस्तार करण्यात आला आहे. गेल्या १२ वर्षांत भारताने परराष्ट्र धोरण आणि संरक्षण क्षेत्रात लक्षणीय झेप घेत जागतिक पटलावर आपले स्थान अधिक मजबूत केले आहे. एकेकाळी आंतरराष्ट्रीय घडामोडींमध्ये मर्यादित भूमिका बजावणारा भारत आज जागतिक निर्णयप्रक्रियेत प्रभावी आवाज म्हणून उदयास आला आहे. त्याचवेळी संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरतेचा मार्ग स्वीकारत भारताने आयातदार देशापासून निर्यातदार देशापर्यंतचा महत्त्वपूर्ण प्रवास पूर्ण केला आहे.
रशिया-युक्रेन संघर्षासारख्या जागतिक संकटात भारताने संतुलित भूमिका घेत संवाद आणि शांततेवर भर दिला. “हे युग युद्धाचे नाही” हा संदेश जागतिक स्तरावर चर्चेचा विषय ठरला. आंतरराष्ट्रीय मंचांवर भारताने विकसनशील देशांचे प्रश्न मांडत स्वतःची स्वतंत्र व विश्वासार्ह ओळख निर्माण केली आहे. परराष्ट्र धोरणातील सक्रिय भूमिका व संरक्षण क्षेत्रातील स्वदेशी क्षमता या दोन आधारस्तंभांवर भारताने गेल्या दशकात आपला जागतिक प्रभाव वाढवला आहे. त्या अनुषंगाने देशाच्या राजकारणात आणि जागतिक पटलावर भारताची प्रतिमा उंचावण्यात या कार्यकाळाचा मोठा वाटा राहिल्याचे राजकीय विश्लेषकांनी स्पष्ट मत व्यक्त केले आहे.
विशेष म्हणजे सत्ताविरोधी लाटेतही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या विकासाचा कायम ध्यास आणि त्यानुसार यशस्वी अंमलबजावणी केली आहे. त्यामुळे आजचा दिवस देशासाठी तेवढाच महत्त्वाचा, गौरवशाली आणि ऐतिहासिक ठरला आहे. त्यानिमित्ताने पनवेलमध्येही महाआरती आणि त्या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निरोगी व दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करण्यात आली.
महाराष्ट्राच्या विकासासाठी पाठीशी राहण्याची मुख्यमंत्र्यांची विनंती
मुंबई ः महाराष्ट्र आता थांबणार नाही, अशी गर्जना आम्ही करतो तेव्हा त्यात आपण ठामपणे पाठीशी आहात, हा आत्मविश्वास मनात असतो. आपली साथ, आशीर्वाद असेच कायम आमच्या आणि महाराष्ट्र विकासाच्या पाठीशी राहोत, अशी विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली. पंतप्रधान म्हणून १२ वर्षांचा कार्यकाल पूर्ण केल्याबद्दल मोदींचे अभिनंदन करताना मुख्यमंत्र्यांनी जाहीर पत्राद्वारे मोदी यांच्या कार्याचा गौरव केला. विकास, विश्वास, जनसहभागाची १२ वर्षे पूर्ण झाली याचा अपार आनंद आज आमच्या मनात आहे, असे मुख्यमंत्र्यांनी पत्रात नमूद केले आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper