संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या हस्ते होणार गौरव
सातारा : रामप्रहर वृत्त
रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे ज्येष्ठ सदस्य, थोर दानशूर व्यक्तिमत्त्व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त संस्थेच्या वतीने शनिवारी (दि. १३) सातारा येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी माजी केंद्रीय कृषिमंत्री तथा संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या हस्ते लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा हृद्य गौरव होणार आहे.
संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित सत्कार सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून माजी विधानसभा अध्यक्ष व संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे ज्येष्ठ सदस्य आमदार दिलीप वळसे-पाटील उपस्थित राहणार असून प्रमुख वक्ते म्हणून ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे असणार आहेत. त्याचप्रमाणे संस्थेचे उपाध्यक्ष ॲड. भगीरथ शिंदे, संघटक डॉ. अनिल पाटील यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे.
ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांनी लिहिलेल्या ‘रामशेठ नाबाद ७५’ ग्रंथाचे प्रकाशन यावेळी खासदार शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे, तर संस्थेच्या वतीने लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकणाऱ्या ‘अमृतपर्व’ या स्मरणिकेचे प्रकाशनसुद्धा त्यांच्या हस्ते होईल.
रयत शिक्षण संस्था व लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे जिव्हाळ्याचे नाते आहे. तळागाळातील विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहचावे यासाठी रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील अर्थात कर्मवीर अण्णांनी सुरू केलेला वसा पुढे नेण्याचे काम रयतसेवक म्हणून लोकनेते रामशेठ ठाकूर अविरतपणे करीत आहेत. स्वतःची जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्था असतानाही त्यांचे रयत शिक्षण संस्थेवर असलेले जीवापाड प्रेम कायम अधोरेखित झाले. रयतला मातृसंस्था मानून सदैव रयतेच्या विकासासाठी कार्य करणारे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी समाजात आदर्श घालून दिला.
सातारा येथे होणाऱ्या सत्कार सोहळ्यास संस्थेच्या जनरल बॉडीचे सदस्य, मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य, शाखाप्रमुख सेवक उपस्थित राहणार आहेत. शिक्षणप्रेमींनी या सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेचे सचिव विकास देशमुख यांनी केले आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper