पनवेलमध्ये शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल उरण आगरी समाज मंडळाच्या वतीने शेतकरी, कामगार व गोरगरीब जनतेच्या कल्याणासाठी संपूर्ण आयुष्य वेचणारे प्रकल्पग्रस्तांचे झुंझार लोकनेते दिवंगत दि. बा. पाटील यांच्या १३व्या स्मृतिदिनानिमित्त रविवारी (दि. २८) पनवेल येथील आगरी समाज मंडळाच्या महात्मा फुले सभागृहात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी मोठ्या संख्येने युवक, नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांनी रक्तदान करून दिवंगत दि. बा. पाटील यांना अभिवादन केले. या सामाजिक उपक्रमाला श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ, जे. एम. म्हात्रे चॅरिटेबल ट्रस्ट, राजस्थानी महिला मंडळ तसेच रुधिरसेतू सेवा संस्था यांचे मोलाचे सहकार्य लाभले. रक्तदान शिबिराला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, दिवंगत नेते दि. बा. पाटील यांचे सुपुत्र अतुल पाटील तसेच पनवेल पालिकेचे महापौर नितीन पाटील यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी रक्तदानाचे महत्त्व अधोरेखित करत अशा सामाजिक उपक्रमांमुळे गरजू रुग्णांना जीवनदान मिळण्यास मदत होत असल्याचे सांगितले.
शिबिराच्या यशस्वितेसाठी पनवेल उरण आगरी समाज मंडळ व सहकार्य करणाऱ्या सर्व सामाजिक संस्थांचे उपस्थित मान्यवरांनी अभिनंदन केले. कार्यक्रमाला कविता पाटील, जितेंद्र म्हात्रे, अरूणा पाटील, माधुरी जगे, राजेश हुद्दार यांसह समाजबांधव, विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
RamPrahar – The Panvel Daily Paper