मुरूड तालुक्यात गाळमुक्त धरण योजनेची कामे जोमात


मुरुड : प्रतिनिधी
गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार या योजने अंतर्गत मुरुड तालुक्यातील धरण व तलावातील गाळ काढण्याच्या कामास जोरदार सुरुवात झाली आहे. तालुक्यात एकाच वेळी आठ ठिकाणी ही कामे सुरु आहेत.
पाणी क्षमता वाढवण्यासाठी धरण किंवा तलावातील गाळ काढणे आवश्यक असून, मुरुड तालुक्यातील विहूर धरण, तसेच सावरोली, उसरोळी, मजगाव व शीघ्रे येथील तलावातील गाळ काढण्याची कामे सुरु आहेत. गाळ काढण्यासाठी लागणार्या जेसीबीकरिता शासनाकडून डिझेल अनुदान प्राप्त झाले आहे. गाळ काढल्यानंतर तो फक्त शेतकर्यांनाच दिला जात असल्याची माहिती तहसिलदार परीक्षित पाटील यांनी दिली.
मे महिन्यात सुकलेल्या धरण व तलावातील गाळ काढल्याने त्याची पाणी साठवण क्षमता वाढेल व त्यात पावसाचे जमा झालेले पाणी दीर्घकाळ लोकांना मिळू शकेल. तसेच धरण व तलावातून काढलेला गाळ शेतामध्ये टाकला तर शेताची पत सुधारून उत्पादनात वाढ होणार आहे. गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेचा फायदा सर्वानाच मिळणार असल्याने स्थानिक ग्रामस्थांनी या योजनेला सहकार्य करावे, असे आवाहन तहसीलदार पाटील यांनी केले.
गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार हा राज्य शासनाचा एक उत्कृष्ट उपक्रम असून, भविष्यात पाणीटंचाई भासू नये यासाठी गाळ काढण्याची खूप आवश्यक आहे. तहसीलदारांनी आवाहन करताच आम्ही विहूर धरण व उसरोली येथील तलावातील गाळ काढण्याच्या कामात सहभाग घेतल्याचे उसरोलीचे सरपंच मनीष नांदगावकर यांनी सांगितले.
मुरूड तालुक्यात धरण व तलावातील गाळ काढण्याच्या कामाला जोरदार सुरुवात झाली असून, लवकरच सर्व कामे पूर्ण होणार आहेत. लोक सहभाग लाभल्याने कामाची गतीसुद्धा वाढली आहे. गाळ काढल्यामुळे पाणी साठवण क्षमता वाढणार असून यांचा फायदा शेतकरी व ग्रामस्थांना होणार आहे.
-परीक्षित पाटील, तहसीलदार, मुरूड
RamPrahar – The Panvel Daily Paper