Breaking News

कळंबोलीतील अंतर्गत रस्त्यांवर गतिरोधक ; वाहनांच्या गतीला चाप

पनवेल : बातमीदार

कळंबोलीत अंतर्गत रस्त्यावर गतिरोधक नसल्यामुळे बेभान दुचाकी चालवून सर्वांचे लक्ष वेधणार्‍या दुचाकीस्वारांना रोखणे कठीण झाले होते. कळंबोली विकास समिती सामाजिक संस्थेच्या वतीने आवश्यक ठिकाणी गतिरोधक बसविण्याची मागणी केली जात होती. अखेर समितीच्या मागणीला यश आले असून शनिवारपासून आवश्यक ठिकाणी गतिरोधक बांधण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली.कळंबोली वसाहतीत मुख्य रस्ते वगळता अंतर्गत रस्त्यांवर गतिरोधक नाहीत. अनेक वर्षांपासून गतिरोधक नसल्यामुळे वेगाने दुचाकी चालविणार्‍या दुचाकीस्वारांच्या दुचाकीला ब्रेक लावला जात नव्हता. सेक्टर 2 येथून सेंट जोसेफ शाळेकडून सिंग सिटी रुग्णालयाकडे जाणार्‍या रस्त्यावर सप्तश्रुंगी मंदिराजवळ, सेक्टर 1 ई येथे कळंबोली गावाकडे जाणार्‍या रस्त्यावर, तसेच केएलई कॉलेजसमोर गतिरोधक बसविण्याची गरज होती. या ठिकाणी गतिरोधक बसविण्यात यावेत, यासाठी कळंबोली विकास समितीच्या माध्यमातून सिडकोकडे पाठपुरावा सुरू होता. वसाहतीच्या अंतर्गत रस्त्यावर गतिरोधक बसविण्यास वाहतूक विभागाचा ना हरकत दाखल लागत असल्यामुळे तो मिळविणेही जिकिरीचे काम होते. कळंबोली वाहतूक शाखा आणि सिडको अधिकार्‍यांशी समन्वय साधून कळंबोली विकास समितीचे अध्यक्ष प्रशांत रनावरे यांच्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. या तिन्ही ठिकाणी गतिरोधक बसविण्याचे काम शनिवारपासून सुरू करण्यात आले. वाहनांना फारसा अडथळा होणार नाही. वसाहतीत कोंडीचा विचार न करता वेगवान धावणार्‍या वाहनांना वेगाला ब्रेक लागेल, अशा पद्धतीने नियोजनबद्ध गतिरोधक बसविण्यात आले आहे. कळंबोली गावाकडे जाणार्‍या रस्त्यावर अनेक वेळा दुचाकीस्वारांचे लहानमोठे अपघात झाल्याच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये तरुणांना जबर जखमीदेखील व्हावे लागले. त्यामुळे वाहतूक विभागाची परवानगी घेऊन गतिरोधकासाठी पाठपुरावा सुरू करण्यात आला होता. मागील आठ महिन्यांपासून सुरू असलेल्या या पाठपुराव्याला यश आले आहे.

Check Also

सुभाष घईंच्या दिग्दर्शनाची यशस्वी पन्नाशी

तुम्हालाही माहित्येय आज आपण डिजिटल युगात वावरतोय, चित्रपट माध्यमात व्हीएफएक्स आणि एआय तंत्रज्ञानाचा वापर वाढलाय, …

Leave a Reply