Breaking News

आफ्रिकेच्या विजयाने लंका अडचणीत

चेस्टर-ली-स्ट्रीट : वृत्तसंस्था

कर्णधार फाफ डु प्लेसिस आणि हाशिम आमला यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने श्रीलंकेवर नऊ गडी राखत मात केली. श्रीलंकेला 203 धावांमध्ये गारद केल्यानंतर द. आफ्रिकेने हे आव्हान एक गड्याच्या मोबदल्यात सहजर पार केले. यंदाच्या विश्वचषक स्पर्धेतील आफ्रिकेचे आव्हान संपुष्टात आलेले असले तरीही या विजयामुळे लंकेच्या मार्गात अडथळे निर्माण झाले आहेत.

आफ्रिकेचा सलामीवीर फलंदाज क्विंटन डी-कॉक हा लसिथ मलिंगाच्या गोलंदाजीवर माघारी परतल्यानंतर हाशिम आमला आणि फाफ डु प्लेसिस यांनी संघाचा डाव सावरला. श्रीलंकन गोलंदाजांचा समाचार घेत दोन्ही फलंदाजांनी भक्कम भागीदारी रचली. मैदानाच्या चौफेर फटकेबाजी आणि गरजेच्या वेळी एकेरी-दुहेरी धाव घेत दोन्ही फलंदाजांनी धावफलक हलता ठेवला. आमलाने नाबाद 80, तर कर्णधार प्लेसिसने नाबाद 96 धावांची खेळी केली. श्रीलंकेकडून लसिथ मलिंगाने एकमेव बळी टिपला.

तत्पूर्वी, ड्वेन प्रिटोरियस आणि ख्रिस मॉरिस यांच्या भेदक मार्‍यासमोर श्रीलंकेचा डाव 203 धावांमध्ये आटोपला. नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय आफ्रिकेच्या गोलंदाजांनी सार्थ ठरवला. श्रीलंकेकडून कुशल पेरेरा, फर्नांडो, मेंडीस यांनी थोडीफार झुंज देण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांचे प्रयत्न अपुरेच पडले.

कगिसो रबाडाने पहिल्याच चेंडूवर श्रीलंकन कर्णधार दिमुथ करुणरत्नेला माघारी धाडले. यानंतर पेरेरा आणि फर्नांडो यांनी छोटेखानी भागीदारी रचत संघाचा डाव सावरला. प्रेटोरियसने फर्नांडोला बाद करीत लंकेची जोडी फोडली. यानंतर श्रीलंकेचे सर्व फलंदाज ठराविक अंतराने बाद होत राहिले. दक्षिण आफ्रिकेकडून ड्वेन प्रेटोरियस, ख्रिस मॉरिस यांनी प्रत्येकी तीन, तर कगिसो रबाडाने दोन बळी घेतले. फेलुक्वायो आणि जे.पी.ड्युमिनी यांनी 1-1 बळी घेत त्यांना चांगली साथ दिली.

श्रीलंकेला आता उपांत्य फेरी गाठायची असल्यास, उरलेले सर्व सामने जिंकून पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्या कामगिरीवर अवलंबून रहावे लागणार आहे.

Check Also

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेणे गरजेचे -आमदार प्रशांत ठाकूर

खारघरमध्ये पर्यावरणपूरक शवदाहिनीचे लोकार्पण, प्राणी अंत्यसंस्कार केंद्राचे भूमिपूजन खारघर ः रामप्रहर वृत्तपर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आपण …

Leave a Reply