पनवेल : रामप्रहर वृत्त
लायन्स क्लब पनवेल, रिलायन्स हॉस्पिटल आणि वैभव ऑप्टीक्स यांच्या वतीनं कळंबोली येथील वाहतूक शाखेमध्ये आरोग्य आणि नेत्रचिकित्सा शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. याचा लाभ अनेक वाहतूक पोलिसांनी घेतला. वाहतूक पोलिसांना ठरवून दिलेल्या जागी दिवसभर काम करावे लागत असल्याने, त्यांना प्रदूषण आणि त्याच्या जोडीला येणार्या आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे त्यांच्या आरोग्याबाबत अनेक तक्रारी येत असतात. या अनुषंगानं वाहतूक पोलिसांची डोळे तपासणी या शिबिरामध्ये करण्यात आली. या शिबिरामध्ये कळंबोली वाहतूक शाखेच्या सुमारे 30 ते 40 कर्मचारी आणि इतरांची तपासणी करण्यात आली. या वेळी लायन्सच्या अध्यक्षा शोभा गिल्डा, सचिव ज्योती देशमाने, वैभव ऑप्टिक्सचे महेश सोनजे, योगेश मगर, रिलायन्स हॉस्पिटलचे सुहास परब यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.