Breaking News

नेरूळ ते भाऊचा धक्का जलप्रवास मार्चपासून

उरण ः रामप्रहर वृत्त

रस्ते वाहतुकीला पर्याय म्हणून जलवाहतुकीवर शासनाने भर दिला असून नेरूळ ते भाऊचा धक्का जलप्रवास दृष्टिक्षेपात आला आहे. नेरूळ जेट्टीचे निम्मे काम पूर्ण झाले असून मार्च 2020 पर्यंत जलप्रवासासाठी जेट्टी तयार असेल, असा विश्वास सिडकोने दाखविला आहे. त्यामुळे पुढील वर्षांत नवी मुंबई ते मुंबई हा प्रवास फक्त 30 मिनिटांत शक्य होणार आहे. खासदार राजन विचारे यांनी नेरूळ जेट्टीच्या कामाची पाहणी केली. त्या वेळी सिडको अधिकार्‍यांनी 50 टक्के काम पूर्ण झाल्याचे सांगितले. सिडकोचे अतिरिक्त मुख्य अभियंता के. एम. गोडबोले, अधीक्षक अभियंता चांडेल मकसूद, तसेच महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाचे अधिकारीही या वेळी उपस्थित होते. या प्रकल्पासाठी सिडकोने 111 कोटींची तरतूद केली आहे. हा प्रकल्प दोन भागांत असून जमिनीवरील भागावर 650 बाय 30 मीटरचा रस्ता बनविण्यात येणार आहे, तसेच पाण्यामध्ये 400 बाय 20 मीटरचा भाग असून 80 बाय 55 मीटरच्या जागेवर पार्किंगची व्यवस्था असणार आहे. यात 25 मोटार, 11 बस उभ्या राहू शकतील. या ठिकाणी टर्मिनल उभारण्यात येत असून त्यात प्रवाशांसाठी प्रतीक्षाकक्ष, तिकीट खिडकी, फूड कोर्ट इत्यादींचा समावेश असणार आहे. या प्रकल्पाचे काम जलद गतीने मार्गी लावण्यात यावे, असे सिडकोचे मुख्य अभियंता केशव वरखेडकर यांना खासदारांनी सांगितले. ठाणे ते नवी मुंबई या मार्गावर आठ ठिकाणी जेट्टी बांधण्यात येणार आहेत. त्यामध्ये वाशी, नेरूळ, बेलापूर, तळोजा, जुईगाव, पनवेल, जेएनपीटी आणि मोरा असा प्रस्ताव आहे. याला 24 ऑक्टोबर 2018 रोजी मंजुरी मिळाली आहे.

Check Also

‌‘नेहले पे देहला‌’ @ ५० वर्षे; पडद्यामागच्या गोष्टी जास्त रंजक

सुनील दत्तच्या वांद्य्रातील पाली हिलवरील अजंठा बंगल्यातील तळघरात असलेल्या मिनी थिएटरमध्ये एखादा चित्रपट अथवा गाणी …

Leave a Reply