खांदा कॉलनी : रामप्रहर वृत्त
नव्याने बांधण्यात आलेल्या सायन-पनवेल महामार्गावरील खांदा कॉलनी उड्डाणपूल हा मृत्यूचा सापळा बनत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अपघात झाले. त्यामध्ये वेगवेगळ्या अपघातात आतापर्यंत चार नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे, तर काही नागरिकांना गंभीर स्वरूपाची दुखापत झाली आहे. या अपघातांची दखल घेत प्रभाग समिती सभापती संजय भोपी यांनी प्रभाग समितीच्या आढावा बैठकीत सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या ही बाब लक्षात आणली. त्यानंतर सभागृह नेते परेश ठाकूर आणि सभापती संजय भोपी यांनी महापालिका शहर अभियंता कटेकर, तसेच अधिकार्यांना सोबत घेऊन अपघाती ठिकाणांचा सर्व्हे करून रस्ता रुंदीकरणाची मागणी केली. खांदा कॉलनीकडून पनवेलच्या दिशेने जाण्यासाठी उड्डापुलाच्या खालून जो बाह्यवळण रस्ता बनवला आहे तो अरुंद आणि कळंबोलीकडून येताना उड्डाणपूल समाप्त होतो तिथेच जोडला गेला आहे. त्यामुळे कळंबोलीकडून भरधाव वेगाने येणारी वाहने आणि खांदा कॉलनीकडून येणारी वाहने एकाच लेनमध्ये एकत्र येतात. त्यामुळे कळंबोलीकडून भरधाव वेगाने आलेल्या वाहनांची धडक होऊन गंभीर स्वरूपात अपघात होत आहेत. त्यामुळे खांदा वसाहतीतील नागरिकांना नाहक जीव गमवावे लागले आहेत. याबाबत लवकरात लवकर निर्णय घेऊन कार्यवाही करावी, अशी मागणी प्रभाग समिती सभापती संजय भोपी यांनी केली आहे.