Breaking News

पूरग्रस्तांना तातडीने मदत द्या ; पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे अधिकार्यांना आदेश

अलिबाग : प्रतिनिधी

रायगड जिल्ह्यात अतिवृष्टी व पूरस्थितीमुळे झालेल्या नुकसानीचा जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी रविवारी

(दि. 11) पुनर्आढावा घेतला. या वेळी त्यांनी नुकसानग्रस्तांना तातडीने मदत देण्यासाठी कार्यवाही करण्याच्या सूचना अधिकार्‍यांना दिल्या.

राजस्व सभागृहात आयोजित आढावा बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. पद्मश्री बैनाडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे, उपविभागीय अधिकारी शारदा पोवार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अजित गवळी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक आदी उपस्थित होते.

या वेळी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी पूरस्थिती व अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात झालेल्या नुकसानीचा सर्वंकष आढावा विविध विभागांकडून घेतला. ते म्हणाले, विद्युत विभागाने जिल्ह्यात 24 तासांपेक्षा जास्त काळ वीजपुरवठा खंडित होणार नाही याची दक्षता घ्यावी. रुग्णालये, तसेच अतिमहत्त्वाच्या ठिकाणी वीज व पाणीपुरवठा सुरळीत चालू असला पाहिजे. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या बांधबंदिस्तीची दुरुस्ती करण्यात यावी. त्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवावा. कोणत्याही प्रकारची रोगराई पसरू नये याकरिता वैद्यकीय सोयीसुविधा पुरविण्यात याव्यात. पूरस्थितीमुळे शेतीचे नुकसान झाल्याने त्याचेही पंचनामे करून त्यांना भरपाई देण्यात यावी. मृत जनावरांचे पंचनामे करून संबंधितांना

नुकसानभरपाई देण्यात यावी. सार्वजनिक बांधकाम विभागाने अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या रस्त्यांची दुरुस्ती करावी. जे रस्ते खचले आहेत, त्या ठिकाणी सूचना फलक, बॅरिकेट्स लावण्यात यावेत व पर्यायी मार्ग तयार करावेत. शाळांचे नुकसान झाल्याने त्यांचीही दुरुस्ती करण्यात यावी. या वेळी विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

रायगड जिल्ह्यात ठिकठिकाणी पाहणी रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी गेले तीन दिवस रायगड जिल्ह्यात ठिकठिकाणी जाऊन अतिवृष्टी व पूरस्थितीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. ना. चव्हाण यांनी शुक्रवारी पनवेल व उरण तालुक्यांचा दौरा करून आढावा घेतला. शनिवारी त्यांनी महाड, रोहे व नागोठणे येथे जाऊन पाहणी केली, तर रविवारी पेण तालुक्याचा आढावा घेतला. झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई देण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी प्रशासनाला दिले आहेत. त्यामुळे पूरबाधित व नुकसानग्रस्तांना दिलासा मिळाला आहे.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply