Breaking News

रस्त्यांची दुरुस्ती शीघ्रगतीने करा

रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे आदेश

मुंबई : प्रतिनिधी

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणार्‍या भाविकांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी या मार्गावरील सर्व  रस्त्यांची शीघ्रगतीने व उत्तम पद्धतीने दुरुस्ती करावी, असे आदेश रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी बुधवारी (दि. 21) येथे दिले. रायगड जिल्ह्यात आगामी गणेशोत्सवासाठी करावयाच्या उपाययोजना, तसेच कायदा- सुव्यवस्थेच्या अनुषंगाने करावयाच्या पूर्वतयारीचा मंत्रालयात आढावा घेण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते.

पालकमंत्री चव्हाण म्हणाले की, रस्ते दुरुस्तीचे काम प्राधान्याने करावे, तसेच एसटी महामंडळाकडून कोकणात जाणार्‍या बसेस सुस्थितीत असाव्यात. जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्था राखली जावी. गणेशोत्सवादरम्यान वीजपुरवठा खंडित होऊ नये यासाठी सर्व आवश्यक ती खबरदारी घ्यावी. सणासुदीनिमित्ताने येणारी मिठाई भेसळमुक्त नसावी. खवा किंवा मिठाईत कोणतीही भेसळ आढळून आल्यास तत्काळ तक्रार करावी, तसेच अधिकार्‍यांनी यावर तातडीने कार्यवाही करावी.

गणेश विसर्जनाच्या ठिकाणी पुरेशी प्रकाश व्यवस्था असावी. विसर्जनासाठी असलेल्या तलावात ज्या ठिकाणी खोल पाणी असेल, तिथे स्वयंसेवकांनी तैनात राहून नागरिकांच्या सुरक्षेची काळजी घ्यावी, असे सांगून जिल्हा शांतता समितीच्या सदस्यांना ओळखपत्रे देण्याच्या सूचना ना. चव्हाण यांनी केल्या. गणेशोत्सव सुखरूप आणि शांततेत पार पडावा यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने सहकार्य करावे, असे आवाहनही पालकमंत्र्यांनी केले.

या बैठकीस रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे, पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांच्यासह रस्ते विकास महामंडळ, औद्योगिक सुरक्षा, महाराष्ट्र मेरीटाइम बोर्ड, सार्वजनिक बांधकाम, वीज वितरण, जिल्हा शल्यचिकित्सक, राज्य उत्पादन शुल्क, अन्न व औषध विभाग, प्रदूषण नियंत्रण मंडळ, राज्य परिवहन मंडळ, आरोग्य विभाग यांचे वरिष्ठ अधिकारी, तसेच जिल्हा शांतता समितीचे सदस्य उपस्थित होते.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply