Breaking News

पेण तालुक्यात 796 दहीहंड्या फुटणार

पेण : प्रतिनिधी

पेण शहर व तालुका परिसरात गोपाळकाळा मोठ्या प्रमाणात व जल्लोषात साजरा केला जातो. तालुक्यात यंदा एकूण 796 दहीहंड्या फुटणार आहेत. त्यात 271 सार्वजनिक, तर खाजगी 525 दहीहंड्यांचा समावेश आहे. त्यांची जय्यत तयारी गोविंदा पथकांकडून करण्यात आली आहे. येथील ललित पाटील मित्रमंडळातर्फे नगरपालिका कार्यालयासमोर यंदा एक लाख 11 हजार 111 रुपये बक्षिसाची दहीहंडी बांधण्यात येणार असून, यशस्वी सलामी देणार्‍या गोविंदा पथकांनाही बक्षिसे दिली जाणार आहेत. युवासेना पेण तालुका शाखेतर्फे येथील महात्मा गांधी मंदिराच्या पटांगणात 55 हजार 555 रुपयांची दहीहंडी बांधण्यात येणार आहे. शहरातील कासारआळी येथे शिवकाली महिला गोविंदा पथकातर्फे महिलांचा गोपाळकाला उत्सव साजरा केला जाणार आहे. मोरया मित्रमंडळातर्फे 10 हजार रुपये बक्षिसांची दहीहंडी लावण्यात येणार आहे. वडखळ येथे युगंधर संस्थेतर्फे एक लाख 11 हजार 111 रुपये बक्षिसांची दहीहंडी उभारण्यात येणार आहे. तर खारपाले येथे खारपाले मित्रमंडळातर्फे नऊ हजार 999 रुपये बक्षिसांची दहीहंडी बांधण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे गोल्डन ग्रुप, एकदंत मित्र मंडळ, नवतरुण गोकुळाष्टमी उत्सव मंडळ, वरदविनायक मित्रमंडळ, शिवसाई मित्रमंडळ, सिद्धेश्वर मित्रमंडळ, लवस्टार ग्रुप- कोळीवाडा, गोपाळकृष्ण मंडळ, देवआळी आदी विविध गोविंदा मंडळांतर्फे दहीहंड्या फोडण्यात येणार आहेत. या मंडळांनी त्याची जोरदार तयारी केली आहे.

चोख पोलीस बंदोबस्त

या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पेण पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात सहा पोलीस अधिकारी, 60 पोलीस कर्मचारी व 20 होमगार्ड, तर वडखळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन पोलीस अधिकारी, 30 पोलीस कर्मचारी व 10 होमगार्ड, तसेच दादर सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन पोलीस अधिकारी, 16 पोलीस कर्मचारी व 10 होमगार्ड अशा पोलीस बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे.

Check Also

कोप्रोली येथे पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ

भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल : रामप्रहर वृत्त केंद्र सरकारची महत्त्वपूर्ण योजना …

Leave a Reply