Breaking News

विकासासाठी भाजपशिवाय पर्याय नाही : लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्त

जनतेच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास घेऊन आमदार प्रशांत ठाकूर आणि जेएनपीटीचे विश्वस्त महेश बालदी भाजपच्या माध्यमातून काम करीत आहेत. पनवेलच्या विकासासाठी आमदार प्रशांत ठाकूर, तर उरणच्या विकासासाठी महेश बालदी यांच्याशिवाय पर्याय नाही, असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी शनिवारी (दि. 14) येथे केले. उरण विधानसभा मतदारसंघातील शेकाप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी आदी पक्षांमध्ये काम करणारे शेकडो रिक्षा-टॅक्सीचालक व मालकांनी वंदे मातरम जनरल कामगार संघटनेच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. त्या वेळी लोकनेते रामशेठ ठाकूर मार्गदर्शन करीत होते.  

आमदार प्रशांत ठाकूर व महेश बालदी लोकांचे प्रश्न सोडविण्याबरोबरच विकासकामांसाठी सातत्याने पाठपुरावा करून निधी आणतात. त्यांनी केलेली कामे सर्वसामान्य जनतेच्या विकासाची असतात. पनवेलमध्ये आमदार प्रशांत ठाकूर व उरणमध्ये महेश बालदी यांनी विकासकामांचा धडाका सुरू ठेवला आहे. आमदार नसतानाही बालदी यांनी केलेली कामे गौरवास्पद असून, त्यांचे केंद्र व राज्यातील दिग्गज नेत्यांसोबत चांगले संबंध आहेत, जे उरणच्या विकासासाठी उपयोगी ठरणार आहेत, असे सांगून लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सांगितले की, कर्तव्यदक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सबका साथ सबका विकास मूलमंत्रानुसार भाजप सरकार काम करीत आहे. त्यामुळे विविध पक्षांतील बडे नेते भाजपमध्ये सहभागी होत आहेत. भाजपने देशाला विकासाची दिशा दिली. सर्वसामान्य नागरिकाला केंद्रबिंदू मानून सरकार काम करीत आहे. आपला देश वेगाने प्रगती करीत असून, तळागाळात विकासकार्य करण्याचे काम भाजपने केले आहे त्यामुळे पुढील काळ भाजपचाच असणार आहे.

आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की, रिक्षा-टॅक्सीचालक दिवसरात्र कष्ट घेऊन कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत असतात. त्यांचा रोजगार सुरक्षित राहिला पाहिजे ही आता आपली जबादारी आहे. त्या अनुषंगाने त्यांचे प्रश्न, समस्या सोडविण्याचे काम केले जाईल. त्यांना सुविधा मिळाल्या पाहिजे यासाठी रिक्षाचालक मंडळाची स्थापना करण्याचे सरकारने ठरवले आहे. त्यानुसार लवकरच या मंडळाची स्थापना होणार असून, निवृत्तीनंतर त्यांना पेन्शन मिळाली पाहिजे यासाठी या मंडळाच्या माध्यमातून तरतूद करण्यात येणार आहे. पनवेल परिसरात रिक्षांची वाढती संख्या लक्षात घेता आता या भागातील परमिट थांबवावीत, अशी मागणी शासनाकडे करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

 आमदार प्रशांत ठाकूर यांनी महेश बालदी यांच्या कार्याचा गौरव करताना सांगितले की, महेश बालदी यांनी कधीच स्वतःचा स्वार्थ पाहिला नाही. म्हणूनच त्यांच्याकडून गेल्या पाच वर्षांत शेकडो रुपयांची विकासकामे झाली. घारापुरी बेट प्रकाशमान करण्याबरोबरच जगातील पहिले शिव-समर्थ स्मारक, करंजा जेट्टी, उरण-पनवेल महामार्ग, सीएनजी पंप, अशी विविध महत्त्वपूर्ण कामे त्यांनी केली आहेत. उरणवर सेफ्टी झोनची टांगती तलवार होती. त्या वेळी तत्कालीन केंद्रीय मंत्री मनोहर पर्रीकर यांच्याशी यासंदर्भात पाठपुरावा करून बालदी यांनी त्यास स्थगिती आणली, साडेबारा टक्के भूखंड प्रश्न निकाली काढण्याचे काम केले. असा अनेकदा पाठपुरावा करून संबंधित प्रश्न सोडवून जनतेला दिलासा आणि विकास देण्याचे काम महेश बालदी यांनी केले असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले.

या वेळी महेश बालदी यांनी शेकापवर टीका केली. शेकापने कर्नाळाच्या नावाने आजवर मते मागितली, पण कर्नाळा किल्ल्याच्या विकासासाठी आपण निधी आणला आहे असे सांगतानाच स्थानिकाला न्याय मिळाला पाहिजे या भूमिकेतून आम्ही पुढे आलो असून, उरण विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहोत, अशी ग्वाही दिली. ते पुढे म्हणाले, उरणच्या माजी व आजी आमदारांनी सत्तेचा अहंकार केला. त्यांनी लोकांना विकासाचा मार्ग दाखविला नाही. त्यामुळे आजही रसायनी परिसरात पाण्याची समस्या गंभीर आहे, तसेच कोन-सावळा रस्त्याची दयनीय अवस्था आहे. रिक्षाचालक व इतर वाहनचालकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत असून, या रस्त्याचे पूर्ण काँक्रीटीकरण झालेच पाहिजे यासाठी आपण प्रयत्नशील आहोत, असेही त्यांनी सांगितले.

रिक्षा-टॅक्सीचालक समाजाचा अभिवाज्य घटक आहे, त्यामुळे त्याचे आयुष्यमान उंचविण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याची ग्वाही माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर व जेएनपीटीचे विश्वस्त महेश बालदी यांनी दिली असून, रिक्षा-टॅक्सीचालकांना मेडिक्लेम पॉलिसी देण्यात येणार आहे.

पनवेल शहरातील मार्केट यार्ड येथील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास भाजपचे राज्य परिषद सदस्य विनोद साबळे, तालुका उपाध्यक्ष के. ए. म्हात्रे, नगरसेविका दर्शना भोईर, माजी नगरसेविका नीता माळी, वंदे मातरम जनरल कामगार संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र घरत, कामगार नेते सुरेश पाटील, कोनचे सरपंच नीलेश म्हात्रे, साईचे सरपंच विद्याधर मोकल, शिरढोणचे माजी उपसरपंच मंगेश वाकडीकर, अ‍ॅड. अजय तेजे, रवींद्र कोरडे, पांडुरंग पाटील, मनोहर मुंबईकर, समीरा चव्हाण यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, रिक्षा-टॅक्सीचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सोहळ्याचे प्रास्ताविक कामगार नेते रवींद्र नाईक यांनी केले, तर उपस्थितांचे आभार मोतीलाल कोळी यांनी मानले.

भाजपने कामातून विश्वास कमविला -आमदार प्रशांत ठाकूर 

सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आपल्या भाषणात म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील प्रत्येक नागरिकाचा विचार केला व सबका साथ सबका विकास या अनुषंगाने कार्य केले. सत्तेच्या विरोधात लाट असते, पण या वेळच्या निवडणुकीत विकासाच्या बाजूने लाट होती. म्हणूनच पुन्हा एकदा नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले. भाजपने कामातून विश्वास कमविला आहे. म्हणूनच कर्तृत्ववान कार्यकर्त्यांचा ओढा भाजपकडे वाढला आहे.

उरणचा सर्वांगीण विकास हाच माझा ध्यास : महेश बालदी

उरण विधानसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास हाच आपला मूळ उद्देश आहे. या दृष्टीने गेल्या पाच वर्षांत अशक्य आहे ते शक्य करण्याचे काम केले. शिव-समर्थ स्मारक, उरण-पनवेल महामार्ग, घारापुरी वीज योजना, करंजा जेट्टी, सीएनजी पंप, अन्न सुरक्षा, उरण शहरात रस्त्याचे काँक्रटीकरण अशी विविध विकासकामे केली असल्याचे जेएनपीटी विश्वस्त महेश बालदी यांनी आपल्या भाषणात सांगितले.

Check Also

पनवेल-उरणच्या पाणी प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली होणार बैठक

आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांचा पाठपुरावा मुंबई : रामप्रहर वृत्तसिडकोमार्फत पनवेल व …

Leave a Reply