पनवेल : रामप्रहर वृत्त
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 150च्या जयंतीनिमित्त स्वच्छता अभियान अंतर्गत खारघर सेक्टर 7 येथील सिडको उद्यानात धर्मसाधना चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून स्वच्छता अभियान आणि लिटल वर्ल्ड मॉलजवळ लायन्स इंटरनॅशनल क्लबच्या माध्यमातून प्लास्टिकबंदी अभियान बुधवारी (दि. 2) राबविण्यात आले. या उपक्रमांना सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट देत आयोजक व उपस्थित नागरिकांचा उत्साह वाढविला.
देशभरात सर्रास प्लास्टिकचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो, मात्र प्लास्टिकचे लवकर विघटन होत नाही आणि त्याचे वाईट परिणाम पर्यावरण मानवी आरोग्यावर होत आहेत. याचा गांभीर्याने विचार करून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्लास्टिकचा वापर टाळण्याचे आवाहन केले आहे.
प्लास्टिकबंदीसाठी सरकारकडून जोरदार प्रयत्न करण्यात येत आहेत. याच अनुषंगाने खारघरमध्ये स्वच्छतेसह प्लास्टिक निर्मूलनाचा निर्धार करण्यात आला.
या उपक्रमास पनवेल महापालिकेचे नगरसेवक नरेश ठाकूर, नगरसेविका आरती नवघरे, भाजपचे खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, अमर उपाध्याय, लायन्स इंटरनॅशनल क्लब व धर्मसाधना चॅरिटेबल ट्रस्टचे पदाधिकारी उपस्थित होते. आमदार प्रशांत ठाकूर यांनी या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक करून सर्वांना शुभेच्छा दिल्या.
RamPrahar – The Panvel Daily Paper