Breaking News

पनवेल मनपाचा शिलकी अर्थसंकल्प स्थायीत सादर

पनवेल : प्रतिनधी

पनवेल महापालिकेचा शिलकी अर्थसंकल्प शनिवारी (दि. 2) स्थायी समितीत सादर करण्यात आला. महापालिका हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या ग्रामीण भागाच्या विकासाला प्राधान्य देऊन त्यासाठी 336 कोटी रुपयांची तरतूद या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी हा अर्थसंकल्प स्थायी समितीचे अध्यक्ष मनोहर म्हात्रे यांचेकडे सुपूर्द केला.

या वेळी स्थायी समितीचे अध्यक्ष मनोहर म्हात्रे, सभागृह नेते परेश ठाकूर, अमर पाटील,सीताताई पाटील, वृषाली वाघमारे, प्रमिला पाटील, आरती नवघरे, तेजस कांडपिळे, गोपीनाथ भगत, विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, बबन मुकादम, हरिश केणी इत्यादी उपस्थित होते.

या वेळी आयुक्तांनी पनवेल महापालिकेचा सन 2018-19 चा सुधारित व सन 2019-20 चा मूळ अर्थसंकल्प महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम 95च्या अन्वये तयार केला असून, तो स्थायी समितीसमोर सादर करण्यात येत असल्याचे सांगितले. सन 2018-19च्या सुधारित अर्थसंकल्पात चालू वित्तीय वर्षातील प्रथम आठ महिन्यातील प्रत्यक्ष जमा उत्पन्न आणि खर्च व पुढील चार महिन्यात होणारा अपेक्षित जमा व खर्च विचारात घेण्यात आला आहे. पनवेल महापालिका ही मुंबईचे प्रवेशद्वार असल्याने पनवेल महानगरपालिका क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी कोणत्या योजना राबविणार याकडे सर्वांचे लक्ष असल्याने या सार्‍या प्रश्नाकडे व्यवस्थित लक्ष ठेवून अंदाजपत्रकात अधिकाधिक बाबींचा समावेश करण्यात आला आहे.

पाणीपुरवठा, रस्ते, अग्निशमन सेवा, शहर सफाई, आरोग्य, शिक्षण, क्रीडा, दिव्यांग कल्याण, महिला व बालकल्याण, वंचितांचा विकास, पूर्वाश्रमीच्या ग्रामपंचायत क्षेत्राचा सर्वांगीण विकास डोळ्यासमोर ठेवून हे अंदाज पत्रक तयार करण्यात आले आहे. यामध्ये महापालिकेच्या मुख्यालयाची इमारत, आयुक्त व महापौर निवास यासाठी तरतूद करण्यात आली आहे. झोपडपट्टी पुनर्विकासासाठी 20 कोटी रुपये, ग्रामीण भागाच्या विकासासाठी 336 कोटी रुपयांची तरतूद आहे. 10 अत्याधुनिक स्मशानभूमी, शववाहिनी यासाठी तरतूद करण्यात आली आहे. महापालिकेला जीएसटी अनुदान 170 कोटी, मालमत्ता फेरमूल्यमापन, पाणीपट्टी, मालमत्ता कर व  इतर शासकीय अनुदानातून उत्पन्न मिळेल.

Check Also

उलवेतील रामशेठ ठाकूर मैदानावर कबड्डीचा थरार!

पनवेल ः रामप्रहर वृत्तसंघभावना, अचूक रणनीती, वेगवान चढाया आणि बचावातील नियंत्रण यांचा रोमांचक संगम उलवे …

Leave a Reply