अलिबाग : प्रतिनिधी
अल्पवयीन मेहुणीला पळवून नेऊन तिच्यावर बलात्कार करणार्या मेहुण्यास येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने 10 वर्षे सक्तमजुरी आणि 10 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. सुनील गजानन पवार (23) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. या खटल्याची थोडक्यात पार्श्वभूमी अशी की, पीडित अल्पवयीन मुलीला तिच्या बहिणीचा नवरा सुनील गजानन पवार याने 16 जुलै 2016 रोजी अलिबाग तालुक्यातील श्रीगाण आदिवासीवाडी येथून पळवून नेले. सुनील हा पनवेल तालुक्यातील बारापाडा आदिवासीवाडीवरचा रहिवासी आहे. 16 ते 28 जुलै या कालावधीत सुनील पवारने पीडित मुलीला पनवेल आणि त्यानंतर पुणे जिल्ह्यातील तळेगाव येथे मित्राच्या घरी नेले आणि वारंवार तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप तिच्या आईने पोयनाड पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादीत केला होता. पोलिसांनी सुनील पवार याच्या विरोधात भादंवि कलम 376 (2)(एन) तसेच पोक्सो कायदा कलम 3 (ए) (4) व 5 (एल) (एन)सह कलम 6नुसार गुन्हा दाखल केला आणि तपास पूर्ण करून दोषारोपपत्र येथील सत्र न्यायालयात दाखल केले.या खटल्याची सुनावणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. एम. मोहिते यांच्या न्यायालयात सुरू होती. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त शासकीय अभियोक्ता अॅड. अश्विनी बांदिवडेकर-पाटील यांनी एकूण सहा साक्षीदारांची साक्ष नोंदवली. तपासिक अंमलदार तथा पोलीस उपनिरीक्षक के. आर. भऊड यांनी केलेला तपास तसेच पोलीस नाईक गावंड व श्रीमती सायगावकर यांचे मोलाचे सहकार्य मिळाले. अॅड. अश्विनी बांदिवडेकर-पाटील यांनी न्यायालयासमोर केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी सुनील पवारला दोषी ठरवून शिक्षा ठोठावली.