उरण : प्रतिनिधी
चिरनेर-विंधणे रस्त्यावरील वेअरहाऊसमध्ये डांबरात अडकून शेवटची घटका मोजत असलेल्या सापाला सर्पमित्रांनी वाचविले. जीवाचा धोका पत्करून जवळ जवळ दोन तास तीन फुटी नागाला चिकटलेली डांबर त्यांनी काढली. नंतर तीन दिवसांनी त्याची जंगलात मुक्तात्त केली. एक नाग खारपाटील वेअरहाऊसमध्ये डांबराच्या पिम्पामध्ये आडकून पडला होता. संपूर्ण डांबर त्याच्या अंगाला लागल्याने त्याला हालचालही करता येत नव्हती. जेमतेम एक इवलीशी नाकपुडी उघडी असल्याकारणाने त्याचा श्वास कसाबसा चालू होता.
सदर घटना सर्पमित्र जयवंत ठाकूर आणि राजेश पाटील यांना समजली व लागलीच वनखात्याला कल्पना देऊन त्यांनी त्या मरणाची वाट पाहत आसलेल्या नागाला घरी आणले. तत्पूर्वी घरी त्याच्या अंगाला लागलेली डांबर काढण्यासाठी आवश्यक असलेला गोडतेल, रॉकेल, हेदाल्यांप, हुक आशी पूर्वतयारी जयवंत यांची मुलगी श्रृष्टी हिने करून ठेवली होती. रॉकेल हे सापांच्या त्वचेला हानिकारक असते, परंतु डांबर काढण्यासाठी ते उपयुक्तही आहे. त्यामुळे त्याचा वापरही जपून करावा लागतो.
नागाचा जबडा प्रथम साफ करण्यात आला. कारण त्याला मोकळा श्वास घेण्यासाठी ते आवश्यक होतं, परंतु नंतरचे काम खर्या अर्थाने धोकादायक होते. कारण नागाचा जबडा मोकळा झालेला व तो फुत्कार टाकत होता, तसेच नागाचे शरीर व सर्पमित्राचे हात दोन्हीही तेलामुळे चिकट झालेले. तरीही जयवंत आणि रजेश यांनी एक तास 50 मिनिटे वेळ खर्च करून त्या सापाला डांबरापासून मुक्त केलं. शेवटी तीन दिवसांनी तीन फुटी नागाला वनखात्याच्या उपस्थितीत जंगलात सोडले.
RamPrahar – The Panvel Daily Paper