ट्वेन्टी-20 मालिकेत बांगलादेशवर मात
नागपूर : प्रतिनिधी
बांगलादेशविरुद्धच्या दीपक चहरने घेतलेल्या हॅट्ट्रिकच्या बळावर भारताने तिसरा आणि अंतिम ट्वेन्टी-20 सामना जिंकला आणि मालिकाही 2-1 अशी जिंकली. श्रेयस अय्यर आणि के. एल. राहुल यांच्या दमदार अर्धशतकामुळे भारताने बांगलादेशपुढे 175 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना दीपक चहरने अवघ्या सात धावा देऊन सहा बळी टिपले. त्यामुळे बांगलादेशची हार झाली.
भारताकडून कर्णधार रोहित शर्मा, शिखर धवन हे दोघे स्वस्तात परतल्यानंतर लोकेश राहुल आणि श्रेयस अय्यर यांनी डाव सावरला. राहुलने सात चौकारांसह 35 चेंडूंत 52 धावा केल्या, तर युवा श्रेयस अय्यरने 33 चेंडूंत 62 धावा करीत आपले पहिलेवहिले टी-20 अर्धशतक झळकावले. मनीष पांडेनेही 13 चेंडूंत 22 धावांची झंझावाती खेळी केली. त्यामुळे भारताने बांगलादेशपुढे 175 धावांचे आव्हान ठेवले.
या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशने अत्यंत खराब खेळी केली. नईम आणि मिथून यांच्यात चांगली भागीदारी होत असताना मिथून 27 धावांवर बाद झाला. एकीकडे गडी बाद होत असताना धमाकेदार खेळी करणारा नईमही मोक्याच्या वेळी 81 धावांवर माघारी परतला. त्यामुळे बांगलादेशचा डाव 144 धावांत आटोपला. दीपक चहरने हॅट्ट्रिक घेत संघाचा विजय साकारला. त्याला सामनावीर घोषित करण्यात आले.
RamPrahar – The Panvel Daily Paper