
पनवेल : बातमीदार
विहीघर येथे एकाच बांधकाम साईटवर काम करणार्या 27 वर्षीय इसमाच्या हत्येचा प्रयत्न करणार्या आरोपीला खांदेश्वर पोलिसांनी मध्य प्रदेश येथून अटक केली आहे. सत्येंद्र रामधर चौधरी (25, अहिरगाव, मध्य प्रदेश) असे या आरोपीचे नाव असून, न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तालुक्यातील विहीघर येथे मरी आई मंदिराच्या पाठीमागे एका बांधकाम व्यावसायिकचे काम सुरू आहे. या ठिकाणी जखमी कमलेश कुमार रामेश्वर कोरी (27, मध्य प्रदेश) व आरोपी सत्येंद्र रामधर चौधरी हे काम करत आहेत. त्यांच्यात यापूर्वी क्षुल्लक कारणावरून भांडणे झाली होती. त्याचा राग मनात ठेऊन सत्येंद्र याने कमलेशकुमार याच्या डोक्यावर लाकड़ी बांबूच्या सहाय्यने जोरदार मारहाण केली. कमलेशकुमार जखमी झाल्यानंतर सत्येंद्र तेथून पळून गेला. खांदेश्वर पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी मध्य प्रदेश येथे असल्याची माहिती वपोनि योगेश मोरे यांना मिळाली. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक एच. जुईकर, पोलीस हवालदार जयंत यादव, पोलीस नाईक प्रफुल्ल कुकले यानी मध्य प्रदेश गाठले. आदिवासी भाग असल्याने आरोपीला पकडणे अवघड काम होते. म्हणून खांदेश्वर पोलिसांनी तेथील ठाना सिव्हील लाइन सतना (मध्य प्रदेश) स्थानिक पोलिसांची मदत घेतली व आरोपी सत्येंद्र रामधर चौधरी याला रात्री अटक केली. कमलेशकुमार याच्यावर एमजीएम रुग्णालय कामोठे येथे उपचार सुरू असून, तो बेशुद्ध अवस्थेत आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक आर. बी. पाचोरकर करत आहेत. आरोपीला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper