खोपोली : प्रतिनिधी
पावसाळ्यानंतर विविध प्रभागांतील खराब रस्ते, वाढीव घरपट्टी व प्रशासनातील अधिकार्यांचा सुस्तपणा या व अशा अनेक विषयांवर नगरसेवकांनी प्रशासनाला अक्षरशः कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केल्याने गुरुवारी (दि. 21) खोपोली नगर परिषदेची सर्वसाधारण सभा गाजली.
खोपोली नगर परिषदेची सर्वसाधारण सभा गुरुवारी छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात संपन्न झाली. या सभेत वाढीव घरपट्टी वसुलीबाबत घाई करणारे प्रशासन घरपट्टी कमी केल्याचे पत्र शासनाकडून आले असतानाही सभागृहासमोर का ठेवत नाहीत, असा मुद्दा मंगेश दळवी यांनी लावून धरला. याच दरम्यान त्यांनी सर्वांत जास्त घरपट्टी प्रभाग क्र. 1मध्ये वसूल होत असताना या भागातील प्रमुख रस्त्यांच्या दुरुस्तीकडे प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप केला.
नगर परिषद हद्दीतील अनेक कारखान्यांची घरपट्टी करोडो रुपयांच्या घरात असताना प्रशासन त्याच्या वसुलीसाठी सुस्त असल्याचा आरोप बेबी सॅम्युअल यांनी केला. अनेक कारखान्यांत विनापरवाना बांधकाम होत असल्याबाबत प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप गटनेते सुनील पाटील यांनी केला.
शिळफाटा येथे मार्केटसमोर कचरा टाकण्यात येत असताना आरोग्य खात्याचे दुर्लक्ष होत असल्याचे नगरसेविका वनिता काळे यांनी सांगताच आरोग्य सभापती प्रमिला सुर्वे व त्यांच्यात शाब्दिक वाद झाला. यावर नगराध्यक्षांनी हस्तक्षेप करीत सदस्यांनी कचर्याचे फोटो सोशल मीडियावर टाकू नये. संबंधित खात्याला कळवावे, असा सल्ला दिला. या चर्चेत सुनील पाटील यांनीही भाग घेतला.
नगर परिषदेचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय शासनाकडे हस्तांतरित करण्याच्या मुद्द्यावरही सभागृहात जोरदार चर्चा झाली. पर्यायी व्यवस्था होईपर्यंत रुग्णालय हस्तांतर करू नये, अशी सूचना या वेळी करण्यात आली. या चर्चेत केविना गायकवाड, सुनील पाटील, लीला ढुमणे व इतर सदस्यांनी भाग घेतला. याच विषयाला धरून केविना गायकवाड यांनी शासनाची 108 रुग्णवाहिका वेळेवर उपलब्ध होत नसल्याने प्रशासनाने रुग्णालयाची रुग्णवाहिका खरेदी करावी असा मुद्दा मांडला. तयार करण्यात आलेले रस्ते कमीत कमी दोन वर्षे टिकले पाहिजेत. तोपर्यंत ठेकेदाराचे बिल देऊ नये, असा आग्रह सर्व सदस्यांनी धरला.या सर्वसाधारण सभेला भाजप गटनेते तुकाराम साबळे, राजू गायकवाड, दिलीप जाधव, कुलदीपक शेंडे, समीर मसूरकर, माधवी रिठे, निर्मला शेलार, सारिका पिंगळे, निकिता पवार, अलका शेंडे, जीनी सॅम्युअल, वैशाली जाधव, मानसी काळोखे, मनेष यादव, अपर्णा मोरे, अर्चना पाटील, निजामुद्दीन जळगावकर, अमोल जाधव आदी सदस्य उपस्थित होते.
RamPrahar – The Panvel Daily Paper