Breaking News

आदिवासी बांधवांवर उपासमारीची वेळ

हक्काचे वरी-नाचणीचे पीक वाया; अवकाळी पावसाचा कहर

पाली-बेणसे ः प्रतिनिधी

सुधागडसह जिल्ह्यात मुसळधार व परतीच्या पावसाने जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या हातचे भाताचे पीक घालवले. माळरान किंवा वरकस जमिनीवर आदिवासी बांधवांनी लावलेले वरी व नाचणीचे हक्काचे पीकही वाया गेले आहे. त्यामुळे वर्षभर काय खावे आणि जगावे कसे, अशा  द्विधा मनःस्थितीत आदिवासी बांधव सापडले आहेत. अर्थात सुधागड तालुक्यातील आदिवासी बांधव दुहेरी पेचात अडकले आहेत. या पिकांच्या उत्पादनातून आदिवासी बांधवांना काही प्रमाणात रोख रक्कम मिळते, मात्र नुकसानीमुळे त्यांच्यावर आता आभाळच कोसळले आहे. जिल्ह्यात नाचणी सहा ते सात हजार हेक्टरवर होते आणि वरी 100 हेक्टरवर केली जाते. जिल्ह्यात सुधागड, श्रीवर्धन, म्हसळा, महाड, पोलादपूर, पेण, कर्जत अशा आदिवासीबहुल तालुक्यांत वरी व नाचणीचे पीक आदिवासी बांधव मोठ्या प्रमाणात घेतात. ते इतरत्रही काही प्रमाणात घेतले जाते, मात्र परतीच्या पावसामुळे वरी व नाचणीची पिके अक्षरशः शेतात लोळली होती. लोंब्या भिजल्याने दाणे खराब झाले, तर काही ठिकाणी पुन्हा रुजवण झाली. काहींचे पंचनामे झालेत, तर काहींचे नाही. अनेक जण भरपाईच्या प्रतीक्षेत आहेत, मात्र काहींची जमीन त्यांच्या नावावर नसल्याने आलेली नुकसानभरपाई ही खोतांनाच मिळणार आहे. नाचणी व वरीची कापणी करताना आदिवासी बांधव रडकुंडीला आले आहेत. कारण हाती काहीच राहिले नव्हते. आपल्या सहचरणीला घेऊन वरीची कापणी करणार्‍या सिद्धेश्वर ठाकूरवाडी येथील राम शिद या आदिवासी बांधवाने सांगितले की, पावसामुळे खूप नुकसान झाले. मागील वर्षीपेक्षा निम्मे उत्पादनही मिळाले नाही. हाती आलेले पीकही खराब आहे. त्यामुळे त्यालाही भाव मिळणार नाही. अशा प्रकारे वरी व नाचणी या नगदी पिकांचे नुकसान झाल्याने हे पिकविणारा आदिवासी बांधव पुरता हतबल झाला आहे.

म्हातार्‍या माणसांना कोणी कामावरही घेत नाही, म्हणून यावर्षी नाचणी लावली, पण पावसामुळे पीक वाया गेले. पंचनामा करायलासुद्धा कोणी आले नाही. मग नुकसानभरपाई तरी कशी मिळणार? उरलेसुरले धान्य वाचवून ठेवत आहे. दरवर्षीच आमच्यावर अशी वेळ येते.

-वामन वारे, गाठेमाळ आदिवासीवाडी

वरी आणि नाचणी ही शेती पिकेच आहेत. त्यांना एकच भाव असल्याने नाचणी व वरी भाताच्या नुकसानीतच दाखविली जाते. जिल्ह्यातील या नुकसानीचे सर्व पंचनामे झाले आहेत.

-पांडुरंग शेळके, जिल्हा कृषी अधिकारी, कृषी अधीक्षक, रायगड-अलिबाग

Check Also

नवीन पनवेलमधील आगग्रस्त कुटुंबांना आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून आर्थिक मदत

माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याकडून घटनास्थळी पाहणी पनवेल ः रामप्रहर वृत्तनवीन पनवेल सेक्टर 1/एस …

Leave a Reply