मॅनचेस्टर : वृत्तसंस्था
वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. सलामीचा फलंदाज शिखर धवन हा संपूर्ण स्पर्धेतून बाहेर झाला आहे. 9 जून रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यावेळी शिखर धवनच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. या मॅचमध्ये शिखर धवनने 117 धावांची खेळी केली होती.
शिखर धवनच्या अंगठ्याला दुखापत झाली असली, तरी टीम इंडियाने आयसीसीकडे बदली खेळाडूची मागणी केली नव्हती. धवनची दुखापत 10-12 दिवसात बरी होईल, असा अंदाज होता, पण धवनची दुखापत बरी व्हायला चार आठवड्यांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे आता बीसीसीआय आयसीसीकडे बदली खेळाडूला परवानगी द्यावी, अशी मागणी करणार आहे. शिखर धवनऐवजी ऋषभ पंत याची टीममध्ये निवड केली जाणार आहे. शिखर धवनची दुखापत बघता याआधीच ऋषभ पंतला इंग्लंडमध्ये पर्याय म्हणून पाठवण्यात आलं होतं. आयसीसीची परवानगी मिळाल्यानंतर ऋषभ पंतचा टीममध्ये समावेशाचा मार्ग मोकळा होईल.
वर्ल्डकपसाठी टीम इंडियाची 15 एप्रिलला निवड करण्यात आली होती. यावेळेस युवा ऋषभ पंतला संधी मिळेल, अशी शक्यता आणि चर्चा पाहायला मिळत होती, परंतु ऋषभ पंतला डच्चू मिळाला, पण अखेरी ऋषभ पंतला वर्ल्डकपमध्ये टीम इंडियात स्थान मिळाले आहे. टीम इंडियाचा पुढील सामना 22 जूनला अफगाणिस्तान विरुद्ध होणार आहे. शिखर धवन वर्ल्डकपमधून बाहेर होणं हा टीम इंडियासाठी मोठा धक्का आहे. आयसीसी स्पर्धांमध्ये धवनने 6 शतकं केली आहेत. यातली 3 शतकं वर्ल्डकपमधली आहेत. आयसीसीच्या स्पर्धांमध्ये धवनची कामगिरी कायमच उल्लेखनीय राहिली आहे.