- सरकारचा विश्वासदर्शक ठराव मंजूर
- संपूर्ण कामकाज घटनाबाह्य : देवेंद्र फडणवीस
मुंबई ः प्रतिनिधी
महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर शनिवारी (दि. 30) विश्वासदर्शक ठरावाची चाचणी पार पडली. या वेळी सरकारला 169 आमदारांनी समर्थन दिले. चार आमदार तटस्थ राहिले. भाजपच्या सर्व 105 आमदारांनी या वेळी सभात्याग केला.
अधिवेशनाला सुरुवात होताच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हे अधिवेशन संविधानाच्या तरतुदीप्रमाणे होत नसून घटनाबाह्य असल्याचा आरोप केला. रात्री-अपरात्री बोलावून असे अधिवेशन होत नाही. आमचे सदस्य ठरावाला पोहचू नयेत म्हणून रात्री निरोप दिला, असा आरोप फडणवीस यांनी केला.
नव्या अधिवेशनाची सुरुवात ‘वंदे मातरम्’ने व्हायला हवी होती. हे अधिवेशन नियमाला धरून नाही. 27 नोव्हेंबरला राष्ट्रगीत झाले म्हणजे अधिवेशन स्थगित झाले. अधिवेशन पुन्हा बोलावण्यासाठी राज्यपालांच्या समन्सची गरज आहे, असे फडणवीस यांनी सांगितले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या वेळी मंत्र्यांचा परिचय करून दिला. यावरही फडणवीस यांनी आक्षेप घेत मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्रिमंडळाने घेतलेली शपथ संविधानानुसार नाही. त्यामुळे त्यांचा परिचय संविधानाला धरून नाही, असा आक्षेप घेतला.
विश्वासदर्शक ठरावासाठी बोलावलेले हे अधिवेशनच घटनाबाह्य आहे, असा आरोप करीत भाजपने या ठरावावर बहिष्कार टाकला आणि विधानसभेतून सभात्याग केला. हे अधिवेशन घटनाबाह्य आहे. त्याची संपूर्ण कारवाई रद्द करावी, अशी मागणी राज्यपालांकडे करणार आहोत. राज्यपालांना यासंदर्भात पत्राद्वारे निवेदन देण्यात येणार आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
फडणवीस यांनी आणखी हंगामी विधानसभा अध्यक्षांच्या नियुक्तीचाही मुद्दा मांडला. राज्यपालांनी हंगामी विधानसभा अध्यक्षांची नियुक्ती केली होती, पण नंतर नियमबाह्य प्रकारे हंगामी अध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली. देशाच्या इतिहासात प्रथमच अशा प्रकारे हंगामी अध्यक्ष हटवण्यात आला आहे. सत्ताधारी पक्षांना आपल्या आमदारांवर विश्वास नसल्याने ते हंगामी अध्यक्षांमार्फत विश्वासदर्शक ठराव घेत आहेत, असा आरोप करीत विधानसभेचे हे संपूर्ण कामकाजच बेकायदेशीर आहे, असे फडणवीस म्हणाले. आम्ही या कामकाजावर बहिष्कार टाकतो, असे सांगत फडणवीस यांच्यासह भाजप आमदारांनी विधानसभेतून सभात्याग केला.
विश्वासदर्शक ठराव; मनसे तटस्थ
मुंबई : महाराष्ट्र विधानसभेत शनिवारी मांडण्यात आलेल्या विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीने बहुमत सिद्ध केले. सभागृहात उपस्थित असलेल्या ज्या चार आमदारांनी विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी तटस्थ राहणे पसंत केले त्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या एकमेव आमदाराचाही समावेश होता.
उद्धव ठाकरे यांचे बंधू आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या पक्षाने शिवसेनेच्या नेतृत्वाखालील सरकारच्या विरोधात मतदान केले नाही. यापूर्वी उद्धव यांच्या शपथविधी सोहळ्यास राज यांनी आवर्जून हजेरी लावली होती. त्यामुळे राज यांचा आमदार कुणाच्या बाजूने मतदान करणार याकडे सर्वांचे लक्ष होते.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तिकिटावर कल्याण ग्रामीणमधून राजू पाटील निवडून आले आहेत. पाटील या वेळी पक्षादेशानुसार तटस्थ राहिले. मनसेसह एमआयएमचे दोन आणि माकपचा एक अशा एकूण चार आमदारांनी महाविकास आघाडी सरकारच्या विश्वासदर्शक ठरावावेळी तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला.
RamPrahar – The Panvel Daily Paper