पोटनिवडणुकीत 15 पैकी 12 जागांवर भाजपचा दणदणीत विजय
बंगळुरू : वृत्तसंस्था
कर्नाटकात विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाने दणदणीत विजय मिळवला असून, भाजप सरकारवरदेखील शिक्कामोर्तब झाले आहे. येडियुरप्पा सरकारला बहुमतासाठी 15 पैकी किमान सहा जागांवर विजय मिळविणे आवश्यक होते. भाजपने 12 जागांवर विजय मिळवत आपली सत्ता कायम राखली आहे.
कर्नाटकमध्ये 17 आमदारांच्या बंडामुळे काँग्रेस-जेडीएसचे सरकार पडले होते. या आमदारांनी राजीनामे देत सरकारचा पाठिंबा काढून घेतला. तत्कालीन विधानसभा अध्यक्षांनी या आमदारांना अपात्र ठरविले होते. आमदार अपात्र ठरल्याने रिक्त झालेल्या 15 मतदारसंघांमध्ये पोटनिवडणूक झाली. त्यापैकी 12 जागांवर विजय मिळाल्याने येडियुरप्पा सरकारला स्पष्ट बहुमत मिळाले. यामुळे विरोधी पक्ष काँग्रेस व जेडीएसला धक्का बसला आहे.
आधी झालेल्या निवडणुकीत या 15 पैकी 12 जागांवर काँग्रेसने विजय मिळवला होता, मात्र पोटनिवडणुकीत काँग्रेसला केवळ तीन जागांवर समाधान मानावे लागले आहे, तर माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्या जेडीएसला एकही जागा जिंकता आली नाही. याआधी 15 पैकी तीन जागा जेडीएसने जिंकल्या होत्या.
224 जागांच्या कर्नाटक विधानसभेत भाजपकडे 105, काँग्रेसकडे 66 आणि जेडीएसकडे 34 आमदार होते. आता भाजपचा आकडा वाढून 117 झाला आहे, तर काँग्रेसचे 69 आमदार झाले आहेत. बहुमतासाठी 111 या जादुई आकड्याची आवश्यकता आहे. आता या निकालामुळे भाजपने स्पष्ट बहुमत प्राप्त केले आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper