पेण : प्रतिनिधी
शहरातील कवंडाळ तलावाजवळ असणार्या दर्ग्याच्या बाबा हजरत हुसैनअली शाह या पिरबाबाचा उरूस 6 व 7 जानेवारी रोजी होणार आहे. या उरूसात पिरबाबांना चादर चढविण्यासाठी पेण तालुक्यातील सर्वधर्मिय बांधव मोठ्या प्रमाणात येतात. हा उरूस म्हणजे सर्व धर्म समभाव अषी याची ख्याती आहे. या निमित्त सोमवारी सायंकाळी परंचम पुशाई (ध्वजारोहण), गुसल शरीफ यासह संदल (मिरवणूक)निघत असल्याने मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित असतात तर मंगळवारी सांयकाळी लंगर (महाप्रसादाचे) तसचे रात्री कव्वालीचे आयोजन करण्यात आले आहे.
खांडसमधील आदिवासींना ब्लँकेट वाटप

कर्जत : राधा मीरा ट्रस्टच्या माध्यमातून खांडस (ता. कर्जत)ग्रामपंचायत हद्दीतील आदिवासी वाड्यांतील बांधवांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. दरवर्षी हिवाळा सुरू झाला की या संस्थेकडून कर्जत तालुक्यातील वेगवेगळ्या भागात ब्लँकेटचे वाटप केले जाते. यंदा खांडस ग्रामपंचायत हद्दीत ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. या वेळी खांडसचे सरपंच मंगल ऐनकर, ग्रामपंचायत सदस्य अंकुश ऐनकर, कैलाश ऐनकर, संस्थेचे अध्यक्ष भरत मेहरा, कार्यकर्ते अॅड. महेश आगे, वर्षा थिटे, स्वप्नाली कोजवे, राजेश पिल्लई, तानाजी डांगरे उपस्थित होते.
माणगावात सावित्रीबाई फुलेंना अभिवादन
माणगाव : येथील एस. एस. निकम इंग्लिश स्कूलमध्ये शुक्रवारी (दि. 3) पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. याच दिवसाचे औचित्य साधून नववी व अकरावीच्या विद्यार्थिनींनी प्रत्यक्ष वर्गावर जाऊन अध्यापन केले. त्यानंतर झालेल्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या कार्याची महती सांगितली. तर प्रमुख पाहुण्या महाड येथील के. ई. एस. इंग्लिश मिडीयम स्कूलच्या सहाय्यक शिक्षिका ममता मेहता यांनी आपल्या भाषणातून शिक्षणाबरोबरच स्वच्छता ही काळजी गरज आहे, असे सांगून कचर्याचे व्यवस्थापन व त्याचा निचरा कसा करावा, यावर प्रकाशझोत टाकला. प्राचार्य सतीश बडगुजर, मुख्याध्यापक शरद मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेल्या या कार्यक्रमाला विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.
RamPrahar – The Panvel Daily Paper