
खोपोली : प्रतिनिधी
केंद्र शासनाने नागरिकत्व सुधारणा विधेयक (सीएए) लोकसभेत व राज्यसभेत संमत केले आणि त्याचे राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतर कायद्यात रूपांतर झाले. या कायद्याच्या समर्थनार्थ रविवारी (दि. 12) जागरूक नागरिक मंचाच्या वतीने खोपोलीत भव्य रॅली काढण्यात आली होती. या वेळी भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांची विशेष उपस्थिती लाभली.
रॅलीत सहभागी झालेल्या नागरिकांनी भारतमाता की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा दिल्याने खोपोली बाजारपेठ दणाणून गेली. हायको कॉर्नरपासून निघालेल्या या रॅलीत महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. रॅलीत तिरंगा झेंडा घेतलेले हजारो तरुण व विविध स्तरांतील व समाजातील लोक होते. बाजारपेठ दीपक चौक, झेनिथ कॉर्नर, वरची खोपोली, केएमसी महाविद्यालय, पोलीस ठाणेमार्गे आलेली रॅली डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोरील प्रांगणात विसावली.
या वेळी डॉ. आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्यास आमदार प्रशांत ठाकूर व माजी आमदार देवेंद्र साटम यांनी पुष्पहार घालून अभिवादन केले. त्यानंतर आमदार ठाकूर यांनी रॅलीस संबोधित करताना हा कायदा कुठल्याही नागरिकांच्या विरोधात नसल्याचे स्पष्ट करून या कायद्याबाबत संपूर्ण माहिती घेऊन तो समजून घ्यावा, असे आवाहन केले.
विहिंप नेते उमेश गायकवाड यांनी या देशाचे पुन्हा तुकडे करण्यासाठी काही शक्ती अराजकता पसरविण्याचा प्रयत्न करीत असल्याबद्दल तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. आज पाकिस्तान, बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार होत आहेत. धर्मांतरे केली जात आहेत. त्या देशांतील अल्पसंख्यांक हिंदूंवर खासकरून महिला भगिनींवर अत्याचार होत आहेत. याची केंद्र सरकारने गंभीर दखल घेत सीएए कायद्याची निर्मिती केल्याचेही त्यांनी सांगितले. पूर्वीच्या सरकारने वर्षानुवर्षे अनेक प्रश्न ताटकळत ठेवले. आता ते प्रश्न सुटत असल्याने काही शक्ती जाणीवपूर्वक सरकारविरोधात विरोधी वातावरण तयार करण्याचा प्रयत्न करीत असल्याबद्दल त्यांनी जोरदार टीका केली, तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्या भूमिकेचे जोरदार समर्थन करीत रॅलीत सहभागी झालेल्या नागरिकांचे विशेषतः महिलांचे व व्यापार्यांचे अभिनंदन केले.
या रॅलीत भाजप जिल्हा उपाध्यक्ष अश्विनी पाटील, सचिव शरद कदम, जागरूक मंचचे अध्यक्ष सुनील भालेराव, भाजप शहराध्यक्ष इंदरमल खंडेलवाल, हेमंत नांदे, नगरसेविका अपर्णा मोरे, रसिका शेटे, अजय जाखोटिया, तालुका अध्यक्ष बापू घारे, सरचिटणीस सनी यादव, प्रसाद पाटील, सचिन मोरे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राकेश पाठक, अविनाश मोरे, दीपक कुवळेकर, रोहित कुलकर्णी, करुणेंद्र तिमाने, माजी शहर अध्यक्ष श्रीकांत पुरी, विजय तेंडुलकर, राकेश दबके यांच्यासह अनेक मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विशेष म्हणजे खोपोली बाजारपेठेतील व्यापार्यांनी दुकाने बंद ठेवून रॅलीत सहभाग घेतला. रॅलीत जैन महिला भगिनींची उपस्थिती लक्षणीय ठरली. जण गण मन या राष्ट्रगीताने रॅलीची सांगता झाली.