शेतकर्यांचे अर्थकारण कोलमडणार


अलिबाग : प्रतिनिधी
अतिवृष्टी, अवेळी पाऊस आणि बुरशी रोग यामुळे यंदा अलिबागच्या पांढर्या कांद्याच्या उत्पादनात घट होणार आहे. यामुळे शेतकर्यांचे अर्थकारण कोलमडणार आहे. पांढर्या कांद्याची लागवड राज्याच्या काही भागात केली जाते, परंतु अलिबाग तालुक्यातील पांढरा कांदा आणि इतर ठिकाणचा पांढरा कांदा यांच्या चवीमध्ये फरक आहे, तसेच अलिबागचा पांढरा कांदा औषधी आहे. त्यामुळे या कांद्याला मोठी मागणी असते. अलिबाग तालुक्यातील कार्ले, खंडाळे, तळवली, सागाव, मानी, भुते या गावांमध्ये वाफ्यावर पांढर्या कांद्याची लागवड केली जाते. दोन महिन्यांत कांदा तयार होतो. मात्र यंदा अतिवृष्टी, अवकाळी पाऊस त्याचबरोबर डिसेंबर, जानेवारी महिन्यामधील ढगाळ वातावरणामुळे पांढर्या कांद्यामध्ये कीडरोगांचा प्रादुर्भाव निर्माण झाला होता. त्यामुळे या कांद्यावर औषधांची फवारणी करावी लागली, मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नाही. अलिबाग तालुक्यात दरवर्षी 250 हेक्टरवर पांढर्या कांद्याची लागवड केली जाते, मात्र या वेळी अतिवृष्टीमुळे शेतात पाणी साचून राहिले. जमिनीत भरपूर ओल राहिली. त्यामुळे यावर्षी तालुक्यात 232 हेक्टरवर कांद्याची लागवड करण्यात आली. यंदा पाऊस लांबल्याने कांद्यावर बुरशीचा प्रादुर्भाव झाला आहे. शेतातील पाण्यामुळे कांद्याच्या रोपट्याच्या मुळांना बुरशी पकडली. रोपटे काढून दुसर्या ठिकाणी लावले तरीही बुरशीमुळे रोपे सुकली. त्यामुळे जानेवारी, फेब्रुवारीदरम्यान तयार होणारा पांढरा कांदा अद्यापही बाजारात आला नाही. अतिवृष्टी, अवेळी पाऊस आणि बुरशी रोग यामुळे यंदा पांढर्या कांद्याच्या उत्पन्नात घट होणार आहे. त्यामुळे यावर्षी शेतकर्यांना आर्थिक तोटा सहन करावा लागणार आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper