जे. पी. नड्डा यांचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल
नवी मुंबई : बातमीदार
महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे महाविकास आघाडी सरकार हे खुर्चीसाठी एकत्र आले आहे, मात्र हे अनैसर्गिक सरकार टिकणार नाही, असे सांगत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी राज्यातील महाविकास आघाडीवर रविवारी (दि. 16) जोरदार हल्लाबोल केला. ते पक्षाच्या राज्यव्यापी अधिवेशनात बोलत होते.
राज्यातील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची महाविकास आघाडी एक अवास्तव आणि अनैसर्गिक गोष्ट आहे. त्यामुळे भाजपला संधी प्राप्त झाली असून पूर्ण ताकदीने आता विरोधी पक्षाची भूमिका पार पाडू. भविष्यात युती न करता महाराष्ट्रात भाजपची सत्ता येईल, असा विश्वास नड्डा यांनी व्यक्त केला.
नड्डा पुढे म्हणाले की, इतर पक्षांनी बर्याचदा प्रसंगी आपली वैचारिक भूमिका बदलली आहे, पण भाजपने आपली विचारसरणी बदलली नाही. आम्ही तुष्टीकरणाच्या राजकारणावर विश्वास ठेवत नाही, परंतु ’सब का साथ, सब का विकास आणि सब का विश्वास’ यासाठी वचनबद्ध आहोत. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मित्रपक्षाने जनादेशाचा अपमान केला. ज्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर व छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला त्यांच्यासोबत ते गेले. आता हे नेते मूकनेत्याची भूमिका वठवत आहेत. येत्या काळात भाजप स्वबळावर लढून एकहाती सत्ता आणेल.
या वेळी नड्डा यांनी काश्मीरमधील परिस्थितीबाबत भाष्य केले. ते म्हणाले, कलम 370 रद्द केल्यामुळे जम्मू-काश्मीरच्या विकासाचा मार्ग खुला झाला आहे. 370 कलमामुळे फुटीरतावाद्यांना बळ मिळत होते. अतिरेकी कारवाया होत होत्या, पण जम्मू-काश्मीरमध्ये आता देशातील कायद्यांची अंमलबजावणी होईल, तसेच काश्मीरमध्ये भ्रष्टाचारविरोधी कायदा लागू करण्यात आला असून, आजपर्यंत ज्यांनी केंद्र शासनाने दिलेले पैसे ओरबाडले ते लवकरच तुरुंगवारी करतील, असेही नड्डा यांनी स्पष्ट केलेे.
आपण हुंडा, बालविवाह पद्धत बंद करू शकलो, तर मग ट्रिपल तलाक का नाही बंद करू शकत? पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांगलादेश, सीरिया, अफगाणिस्तान, मलेशियात ट्रिपल तलाकला कायद्यानुसार बंदी आहे. मग भारतातच याबाबत का विरोध होत आहे, असा सवाल करून पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्यामुळे कायदा लागू झाल्याने अनेक मुस्लिम महिला भगिनींना न्याय मिळणार आहे, असे नड्डा यांनी सांगितले.
काही राजकीय पक्ष व्होट बँकेसाठी नागरिकत्व सुधारणा कायदा सीएएला विरोध करीत आहेत, मात्र आमच्यासाठी देश प्रथम आणि नंतर व्होट आहे. सीएएमुळे मुस्लिम बांधवांना कसलाही धोका निर्माण होणार नाही, असा दावाही त्यांनी केला.
आपल्या भाषणात नड्डा यांनी फडणवीस सरकारच्या कार्यकाळात झालेल्या कामांचा आढाव घेत ते म्हणाले की, महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस सरकारने अनेक चांगल्या योजना राबविल्या. यातील जलयुक्त शिवार योजनेचे कौतुकदेखील झाले. 16 लाख कोटींच्या पायाभूत सुविधा उभारून त्याची पायभारणी केली गेली. कृषी, शिक्षण क्षेत्रात राज्याचा अधोगतीला गेलेला क्रमांक सुधारला.
शिवसेनेने सत्तेसाठी आपली सर्व तत्त्वे गुंडाळून मातोश्री बंगल्याच्या एका कोपर्यात ठेवली आहेत आणि हे सरकार महाराष्ट्राच्या जनतेची घोर फसवणूक करीत आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रात एक सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करेल, असा निर्धार प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.
आम्ही घेतलेले लोकोपयोगी निर्णय नव्या सरकारने रद्द केले. स्वातंत्र्यवीर सावरकरांना बलात्कारी म्हटले गेले. त्यांच्यासोबत हे गेले. छत्रपती शिवरायांच्या वंशजांचे पुरावे मागितले जातात. दोन लाखांच्या वरच्या कर्जमाफीचे काय? सातबारा कोरा करणार होते त्याचे काय? असे सवाल करून हे फसवे सरकार आहे, अशी टीका प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. या सरकारमध्ये कायद्याची भीती राहिलेली नाही. राज्यात महिला असुरक्षित आहेत. नागरी सुरक्षा कायदा अंमलबजावणी करण्यात चालढकल करीत आहेत, यावरूनही पाटील यांनी आघाडी सरकारला धारेवर धरले.
व्यासपीठावर भाजपच्या महाराष्ट्र राज्य प्रभारी सरोज पांडे, राष्ट्रीय सहसंघटनमंत्री व्ही. सतीश, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, माजी मुख्यमंत्री व विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फ डणवीस, खासदार रावसाहेब दानवे, नारायण राणे, विनय सहस्त्रबुद्धे, माजी खासदार उदयनराजे भोसले, माजी मंत्री एकनाथ खडसे, राधाकृष्ण विखे-पाटील, पंकजा मुंडे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, प्रदेश संघटक विजय पुराणिक, आमदार गणेश नाईक, आमदार मंदा म्हात्रे आदी उपस्थित होते. प्रदेशाध्यक्षपदी फेरनिवड झाल्याबद्दल चंद्रकांत पाटील यांचा, तर मुंबई अध्यक्षपदी फेरनिवड झाल्याबद्दल मंगलप्रभात लोढा यांचा या वेळी सत्कार करण्यात आला.
अयोध्येत नक्की जा : देवेंद्र फडणवीस
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात अयोध्येमध्ये भव्य राम मंदिराचे निर्माण होणार आहे. यावरून आता काही जण अयोध्येला जाण्याची भाषा करीत आहेत. त्यांनी अयोध्येला नक्की जावे म्हणजे त्यांचे खरे हिंदुत्वाचे रक्त जागे होईल, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला लगावला आहे. शहरी नक्षलवादाचे सत्य बाहेर येईल म्हणून एसआयटीची मागणी करण्यात येत आहे, असा आरोपही फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर या वेळी केला.
RamPrahar – The Panvel Daily Paper