श्रीवर्धन-म्हसळा मार्गावरील प्रवाशांची फरफट

म्हसळा : प्रतिनिधी
राज्य परिवहन महामंडळाच्या श्रीवर्धन आगाराने ग्रामीण भागातील अनेक बसफेर्या कमी केल्या असून, भिवंडी, ठाणे, भांडूप, भाईंदर या फेर्या रद्द केल्या आहेत. त्यामुळे श्रीवर्धन-म्हसळा मार्गावरील प्रवाशांची फरफट होत आहे. शासनाने ’गाव तेथे रस्ता’ आणि राज्य परिवहन महामंडळाने ’रस्ता तेथे एस़टी़’ असे धोरण अंगीकारले आहे़, मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाने ‘रस्ते तिथे खड्डे‘ असे धोरण ठेवल्याने म्हसळा आणि श्रीवर्धन या दोन्ही तालुक्यांतील अनेक रस्ते खड्डेमय झाल्याने एसटी महामंडळाच्या श्रीवर्धन आगाराने ग्रामीण भागातील बसफेर्या कमी केल्या आहेत, तर भिवंडी, ठाणे, भांडूप, भाईंदर या फेर्या रद्द केल्या असल्याची तक्रार प्रवाशांकडून होत आहे. श्रीवर्धनहून भिवंडी, बोर्ली -मुंबई, भाईंदर, ठाणे, भांडूप या गाड्या पूर्ववत सुरू कराव्यात, अशा मागण्या प्रकर्षाने होत आहेत. नालासोपारा ते आंबेतमार्गे पांगळोली (रात्री 10 किंवा सकाळी 6 वाजता) व बोरिवली ते आंबेतमार्गे पांगळोली सकाळी 6 वाजता बस असावी, अशी मागणी आंबेत खाडीपट्टा भागातील दाभोळ, आंबेत, संदेरी, गडदाव, फळसप, आमशेत, लिपणीवावे, मरियम खार, कुडगाव, पांगळोली, तोराडी आदी गावांतील प्रवाशांची आहे. श्रीवर्धन-म्हसळा-बोर्ली -दिघी-तुरूंबाडी-वारळ परिसरातील अनेक कुटुंबे नालासोपारा-वसई -विरार परिसरात वास्तव्यास आहेत. श्रीवर्धन आगाराने या मार्गावरील फेर्या कमी केल्याने गेल्या काही महिन्यांपासून या भागातील प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत.
आंबेत पूल गेली काही महिने बंद असल्याने मंडणगड, दापोलीकडे जाणार्या एसटी बसेसही बंद झाल्या आहेत. परिणामी या भागातील प्रवाशांचे हाल होत आहेत, मात्र लोकप्रतिनिधींचे आंबेत खाडीपट्टा भागाकडे दुर्लक्ष होत आहे.
-बबन भिकाजी उंडरे, पांगळोली
श्रीवर्धन आगारात उपलब्ध गाड्या विविध मार्गांवर चालविल्या जातात, मात्र त्यासाठी चालक-वाहक कमी आहेत. कर्मचारी व गाड्यांची उपलब्धता झाल्यावर निकषानुसार गाड्या सुरू करण्यात येतील.
-मेहबूब जुनेद, आगार व्यवस्थापक, श्रीवर्धन
RamPrahar – The Panvel Daily Paper