उरण : रामप्रहर वृत्त
देशातील जनतेला कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये यासाठी शासन सर्व स्तरावर प्रयत्न करत असताना जेएनपीटी बंदर परिसरात सध्या मोठ्या प्रमाणात मालाची आयात-निर्यात करण्यासाठी देश परदेशातील अनेक कामगार ये-जा करत आहेत. त्यामूळे जेएनपीटी बंदराच्या प्रशासनाने खबरदारी म्हणून एकतर बंदरातील कामकाज बंद करावे नाही तर या बंदर परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी युध्दपातळीवर उपाययोजना करून बंदरात काम करणार्या कामगारांना विमा संरक्षण कवच देण्यात यावे अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या नवभारतीय शिव वाहतूक संघटनेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष निर्गूण कवळे यांनी जेएनपीटी बंदराचे चेअरमन संजय सेठी यांना दिलेल्या निवेदन पत्रकाव्दारे केली आहे.
सध्या देशात कोरोनाची दहशत निर्माण झाली आहे. सर्व जनता भिंतीच्या सावटाखाली आपले जीवन जगत आहे. त्यात देशाच्या व देशबांधवांच्या सुरक्षिततेसाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 144 कलम अंतर्गत लॉकडाऊन 14 एप्रिल 2020 पर्यंत लागू केले आहे. यात जीवनावश्यक वस्तू, मेडिकल सोडले तर देशातील संपूर्ण व्यवहार बंद करण्यात आलेला आहे.एकंदरीत असे असतानाही मुंबई शहराच्या हाकेच्या अंतरावर असलेले जेएनपीटी बंदर तसेच या बंदरावर आधारित असणार्या इतर बंदरातील कामकाज हे सुरू आहे.
या बंदरात देश परदेशातील मालाची आयात-निर्यात मोठ्या प्रमाणात होत असल्याने या बंदरात देश परदेशातील अनेक कामगार ये-जा करत आहेत. त्यामूळे या बंदर परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याचा संभव आहे. तरी जेएनपीटी बंदराच्या प्रशासनाने खबरदारी म्हणून एकतर सदरच्या बंदरातील कामकाज बंद करावे न पेक्षा बंदर परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी युध्दपातळीवर उपाययोजना करण्यासाठी पुढाकार घ्यावा, तसेच बंदर परिसरात कामकाज करणार्या कामगारांना विमा संरक्षण कवच देण्यात यावा अशी मागणी नवभारतीय शिव वाहतूक संघटनेच्या माध्यमातून जेएनपीटी बंदराचे चेअरमन संजय सेठी यांना दिलेल्या निवेदन पत्रकाव्दारे केली आहे.
जेएनपीटी बंदरात जीवनावश्यक वस्तूच्या मालाची देवाणघेवाण होत असल्याने केंद्र सरकारच्या माध्यमातून सदर बंदर सुरू आहे.तसेच बंदर परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी युध्दपातळीवर उपाययोजना करण्यात आल्या असून ग्रामपंचायत हद्दीत औषधांची फवारणी बरोबर बंदरात ये-जा करणार्या चालकांना जेवण उपलब्ध करून देण्याचे काम सुरू केले आहे. आणि बंदरातील 265 कामगार तसेच सुमारे 2 हजार कंत्राटी कामगाराना विमा संरक्षण कवच देण्यात येणार आहे.
– मनिषा जाधव, व्यवस्थापक अधिकारी, जेएनपीटी बंदर
RamPrahar – The Panvel Daily Paper