अन्नधान्याच्या कमतरतेने एकदाच जेवत असल्याची व्यक्त केली खंत; प्रशासनाचे दुर्लक्ष

उरण : रामप्रहर वृत्त
कोरोनाचा प्रार्दुभाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. यामुळे रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. यावर ठोस उपाययोजना म्हणून सर्वच सेवा बंद केल्या आहेत. गेले 10 ते 15 दिवस शहरात अथवा शेजारच्या गावातही जाता येत नसल्यामुळे रानसई आदिवासी वाडीवरील आदिवासी बांधवांना कोणतीच शासकीय मदत सोडा पण कोण साधी चौकशीही करीत नसल्याचा आरोप करीत आमच्यावर उपासमारीचे संकट कोसळले असल्याची खंत त्यांनी पत्रकारांसमोर व्यक्त केली.
लॉकडाऊनमुळे सर्वच बंद असल्याकारणाने उरणपासून 10 ते 17 किलोमीटर अंतरावर असलेल्या रानसई येथील सहा वाड्यांवर उपजीविकेसाठी घरातील अन्नधान्याचा साठाही संपत आसल्याने पुढील दिवस कसे काढायचे असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे. या ठिकाणी जाण्यासाठी अत्यंत खडतर मार्ग आहे. त्यामुळे या वाड्या नेहमीच उपेक्षित राहत असल्याचे त्यांच्या बोलण्यातून आले. या ठिकाणी आदिवासींचा मोलमजुरी आणि भाजीपाल्याचे मळे यावरच उपजीविका चालत असते. मात्र कोरोनामुळे तोही मार्ग बंद झाला आहे. भाजीपाला आहे परंतु नेण्यासाठी साधनांचा अभाव आहे.
रानसईतील बंगल्याची वाडी, खोड्याची वाडी, सागाची वाडी, मार्गाची वाडी, भुर्याची वाडी, खैरकाठी या हाकेच्या अंतरावर वसलेल्या आहेत. एका वाडीत सरासरी 60 ते 70 घरे आहेत. अशा 1200 घरांच्या वस्तीत तीन हजाराच्या जवळपास वाडीतील लोकसंख्या आहे. या सर्व वाड्या रानसई ग्रामपंचायत हद्दीत येतात. तसेच वाड्यांच्या शेजारील गावात मोलमजुरी अथवा मळ्यातील भाजीपाला उरण अथवा पनवेल बाजारपेठेत विक्रीस नेऊन मिळणार्या पैशात त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत असतो. मात्र लॉकडाऊनमुळे हा मार्गच बंद होऊन 10 ते 15 दिवसांचा अवधी उलटल्याने घरातील होते नव्हते ते अन्नधान्य संपले आहे. नेहमी तीनवेळा जेवणारे आता दिवसातून एकवेळच जेवत आहेत. परंतु तोही साठा आता संपत असल्याने पुढील दिवस उपासमारीत घालवावे लागतील, असे त्यांनी सांगितले.
रोजगारीचे सर्व मार्ग बंद झाले, त्याचबरोबर भाजीपाला आहे, पण शेतात पाणी आणण्यासाठी डिझेल पंपाचा वापर केला आहे. परंतु बंदमुळे डिझेल मिळेनासे झाल्याने भाजीपालाही सुकत चालला आहे. रस्ता खराब, अंतर जास्त असल्याने भाड्याने वाहन येण्यास नकार देतात. तसेच पाण्यानेही तळ गाठल्याने पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. तसेच रेशनवरील धान्यही मिळत नाही. कोरोनाच्या भीतीमुळे सर्वच रोजगार बुडाला आहे.
-गीता भगत, सरपंच, रानसई ग्रामपंचायत
मदतीची मागणी
शासनाकडून भरघोस मिळत असल्याचे सांगितले जात असले तरी आमच्याकडे अद्यापपर्यंत कोणताच शासकीय अधिकारी विचारपूस करण्यासाठी आलेला नाही, अथवा कोणतीही मदत दिली नाही. जी काही तुटपुंजी मदत सामाजिक संस्थांकडून आली तीही अपुरी ठरत आहे. ही परिस्थिती अशीच राहिली तर उपासमारीमुळे आमचे बळी जाण्याची शक्यता आहे. तरी आमच्या जगण्यासाठी आर्थिक बळ द्यावे, अशी मागणी करताना या आदिवासी महिलांच्या डोळ्यांत अश्रू दाटून आले. शासनाने या वाडीवरील आदिवासी बांधवांचा लवकरात लवकर विचार करुन त्यांना अन्नधान्य साठा पुरवावा.
RamPrahar – The Panvel Daily Paper