Breaking News

मुलांसाठी आहार

मुलांच्या वाढीत सकस आणि संपूर्ण आहार महत्त्वपूर्ण भूमिका निभावतो. वाढत्या वयाच्या मुलांची मूलभूत गरज या माध्यमातून पूर्ण होते. आयुष्यभरातल्या खाण्यापिण्याच्या सवयींचा पायाच लहान वयात पडत असतो. त्यामुळे वाढत्या वयात मिळणार्‍या आहाराला नितांत महत्त्व आहे. विशेषत: बाळ जन्मल्यापासून ते दोन वर्षांचे होईपर्यंत पोषक आहार द्यायला हवा. यासाठी वयोमानानुसार बालकांना काय आहार दिला पाहिजे याची माहिती गरजेची आहे.

पहिल्या टप्प्यात जन्मापासून सहा महिन्यांपर्यंतच्या कालावधीत आईचे दूध (अंगावरील स्तनपान) द्यायचे असते. मातेला दूध नसल्यास तसेच काही अपरिहार्य कारणास्तव डॉक्टर पावडरचे दूध सुरू करण्याचा सल्ला देऊ  शकतात, मात्र ते कसे, किती आणि कधी घ्यायचे हे डॉक्टरांना विचारूनच घ्यावे. या काळात बाळाला गरजेनुसार पाजावे. बाळाला दिवसातून किमान सहा ते सात वेळा लघवी होत असेल आणि बाळाचे वजन योग्य प्रमाणात वाढत असेल तर बाळाला पुरेसे दूध मिळत आहे असे समजावे.

दुसर्‍या टप्प्यात सहा ते आठ महिने या कालावधीत बाळाला आईच्या दुधाव्यतिरिक्त वरच्या अन्नाची गरज भासते. अशा वेळी पालकांवर नेहमीच सल्ल्यांचा मारा होतो. पालक या सल्ल्यांनी गोंधळून जातात. अशा स्थितीत बाळांना फळे देण्याची सुरुवात करावी. पिकलेले केळे चमच्याने बारीक करून त्यात दूध (आईचे असल्यास उत्तम) मिसळून एक ते दोन घासापासून फळ आहाराची सुरुवात करावी. त्यानंतर निरनिराळी फळे वापरून दर आठवड्याला आहार वाढवावा, मात्र या काळात बाळाला फळांची मिळणारी चव, त्याची आवडनिवड पाहता खाऊ घालताना संयम ठेवणे महत्त्वाचे आहे.

यानंतरच्या काळात शिजवलेला मऊ भात दूध टाकून चमच्याने खाऊ घालावा. भात आणि मूगडाळीची खिचडी द्यावी, तसेच गाजर, भोपळा, बीट आणि टोमॅटो मिसळून बनवलेले सूप चवीसाठी देता येते. अन्नपदार्थांच्या या गर्दीत पालकांनी एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की बाळाला तांदळाचे पाणी, डाळीचे पाणी देऊ  नका. त्याने बाळाचे पोट तर भरते मात्र पोषकता मिळत नाही. एकदा का बाळ वरील गोष्टी घ्यायला लागले की त्यानंतर अतिशय पोषक मिश्रण देणे गरजेचे ठरते. तांदूळ, गहू, नाचणी, मूगडाळ समप्रमाणात घेऊन एकत्र करून भाजून त्यानंतर दळून घ्यावे आणि हवाबंद डब्यात साठवून ठेवावे.

Check Also

सीकेटी कॉलेजमध्ये वार्षिक पारितोषिक वितरण आणि स्नेहसंमेलन उत्साहात

पनवेल : रामप्रहर वृत्तजनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनीतील स्वायत्त दर्जाप्राप्त चांगू काना ठाकूर …

Leave a Reply