मुंबई : प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च 2020मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेच्या निकालाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. दहावीच्या सामाजिक शास्त्रे पेपर-2 (भूगोल) व दिव्यांग कार्यशिक्षण या परीक्षा रद्द करण्यात आलेल्या विषयांच्या गुणदानासंदर्भात शिक्षण मंडळाने पर्याय शोधला आहे. इतर विषयांमध्ये विद्यार्थ्यांना मिळालेल्या गुणांची सरासरी काढून त्या आधारे भूगोलाचे गुण दिले जाणार आहेत.
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने खबरदारीचा उपाय म्हणून इयत्ता दहावीच्या सामाजिक शास्त्रे पेपर-2 (भूगोल) या विषयाची लेखी परीक्षा आणि त्यानंतर होणारी दिव्यांग विद्यार्थांच्या कार्यशिक्षण या विषयांची परीक्षा रद्द करण्यात आली होती. आता सामाजिक शास्त्रे पेपर-2 (भूगोल) या विषयाचे गुणदान हे विद्यार्थ्याच्या अन्य विषयांतील गुणांची सरासरी विचारात घेऊन केले जाणार आहे, तर दिव्यांग विद्यार्थ्यांच्या कार्यशिक्षण या विषयाचे गुणदान त्याने अन्य विषयांच्या लेखी, तोंडी, प्रात्यक्षिक, अंतर्गत मूल्यमापन, तत्सम परीक्षेत प्राप्त केलेल्या गुणांची सरासरी विचारात घेऊन, त्याचे रूपांतर परीक्षा रद्द केलेल्या कार्यशिक्षण विषयाच्या परीक्षेसाठी निर्धारित केलेल्या गुणांमध्ये करण्यात येणार आहे. या विषयांच्या परीक्षेसाठी गुणदान करून निकाल जाहीर केले जाणार असल्याची माहिती शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी पत्रकाद्वारे दिली.
Check Also
युवा शक्ती जागर यात्रेनिमित्त कृष्णराज महाडिक यांचा उत्तर रायगड दौरा
पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष व युथ आयकॉन कृष्णराज महाडिक मंगळवार …
RamPrahar – The Panvel Daily Paper