मे महिन्यात 1600हून अधिक कोरोनाबाधित; 54 जण मृत्युमुखी

नवी मुंबई : प्रतिनिधी
मनपा हद्दीत एप्रिल महिन्याच्या तुलनेने मे महिन्यात कोरोना संक्रमणाने कहर केला असून तब्बल 1600 पेक्षा जास्त रुग्णांना कोरोना झाला आहे. तर मृत्यूचे प्रमाणही वाढले असून एकूण 54 जणांचा मृत्यू झाला आहे. तर एकूण कोरोनाबाधितांची संख्या 1853 वर पोहचली आहे. त्यामुळे मनपा प्रशासनाने आपल्या कार्यशीलतेमध्ये अधिक प्रभावी उपाययोजना राबविण्याची गरज भासू लागली आहे. मे महिन्याच्या सुरुवातीपासून कोरोनाचा संक्रमणाचा आलेख चाट करणारा आहे. 1 मे रोजी 20 कोरोनाग्रस्त होते. त्यानंतर दर दिवशी सरासरी 40 पासून 105 रुग्णांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली. 11 मे रोजी तर रेकॉर्ड ब्रेक करत 105 रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचे वैद्यकिय रिपोर्ट प्राप्त झाले होते. 30 एप्रिल रोजी 239 कोरोना बाधितांची संख्या होती. परंतु आज रोजी 1853 वर पोहचली आहे. यावरून नवी मुंबईत कोरोनाग्रस्तांची संख्या किती झपाट्याने वाढते याची
प्रचिती येते.
पालिका आरोग्य विभागाच्या अहवालानुसार 27 मे रोजी 79 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. तर एकूण कोरोना बाधितांची संख्या 1853 वर पोहचली आहे. आजतागायत बरे होऊन गेलेल्या रुग्णाची संख्या 840 वर पोहचली आहे. सध्या घरी अलगीकरण करण्यात आलेल्या रुग्णांची संख्या 8753 ते अलगीकरण पूर्ण केलेल्या नागरिकांची संख्या 19326 इतकी आहे. तर 30 एप्रिलपर्यंत पाच रुग्णांचा मृत्यू झाला होता. तर मे महिन्यात 54 जणांचा बळी गेला आहे. 900 रुग्णांचे रक्त तपासणी अहवाल येण्याचे बाकी आहेत. यावरून मे महिन्यात कोरोनाची वाढलेली दाहकता दिसून येत आहे.
ज्या नागरिकाला कोरोना आजाराची लक्षणे दिसतात ते नागरिक कोरोना टेस्ट करण्यासाठी जातात. परंतु टेस्ट रिपोर्ट दहा दिवसापेक्षा जास्त कालावधीत प्राप्त होत असल्याने टेस्ट करणारा रुग्ण कुठेही फिरत असतो. त्यावर बंधन ठेवण्यास कोणताही घटक उपलब्ध नसल्याने कोरोनाचा प्रभाव वाढत असल्याचे वास्तव आहे. तसेच कोरोना बाधितांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांची कोरोना टेस्ट केली जात नसल्याने ते सुद्धा कोरोनाबाधित होण्याचे कारण सांगितले जात आहे.
आम्ही आमच्या परीने प्रयत्न करतोय. पण नागरिकांनी सुद्धा आपली काळजी घेणे गरजेचे आहे. तरच आपण कोरोनावर विजय मिळवून यशस्वी होऊ शकतो.
-संजय काकडे, अतिरिक्त आयुक्त, मनपा
RamPrahar – The Panvel Daily Paper