कर्जत ः बातमीदार
कर्जत तालुक्यातील पळसदरी येथील मध्य रेल्वेच्या धरणामध्ये असलेल्या मगरींपैकी एका मगरीला पकडण्यात वन विभागाला यश आले आहे. वन विभागाने धरणातील मगरीला पकडण्यासाठी बदलापूर आणि डोंबिवली येथील तरुणांच्या रेस्क्यू पथकावर मगरीला पकडण्याची जबाबदारी सोपविली होती.
मध्य रेल्वेने गाड्यांसाठी लागणारे पाणी मिळावे म्हणून धरणे बांधली होती आणि त्यात पळसदरी या ठिकाणीदेखील पाण्यासाठी धरण बांधले होते, मात्र मध्य रेल्वेने आपली इंजिने ही डिझेलमध्ये कन्व्हर्ट केल्याने इंजिनासाठी लागणारा पाण्याचा वापर थांबला आहे. त्यामुळे गेली 20 वर्षे कर्जतजवळील पळसदरी येथील धरणातील पाणी रेल्वेकडून वापरले जात नाही. त्यामुळे धरणातील पाणी अनेक वर्षे पडून असून त्या धरणात तीन वर्षांपूर्वी तीन मगरी अज्ञात लोकांकडून सोडण्यात आल्या होत्या. त्यातील एक मगर चार महिन्यांपूर्वी मृत अवस्थेत सापडली, मात्र धरणाच्या आसपास राहणार्या आदिवासी लोकांना त्या मगरी दिसत असल्याने आदिवासी लोक मगरींना पकडून नेण्याची वन विभागाकडे सातत्याने मागणी करीत होते.
त्यामुळे कर्जत वन विभागाने पळसदरी रेल्वे धरणातील मगर पकडावी यासाठी बदलापूर येथील रेस्क्यू टीमला काम दिले होते. त्यासाठी बदलापूर येथील वनक्षेत्रपाल प्रमोद ठक्कर यांच्याकडून बदलापूर, डोंबिवली येथील रेस्क्यू टीमने कर्जत येथील रेस्क्यू टीमच्या मदतीने पळसदरीमध्ये मगर पकडण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला.
पहाटे चार वाजता धरणाच्या पाण्यात हालचाल जाणवून ट्रॅपमध्ये मगर अडकली. मोठा आवाज येऊ लागल्याने रेस्क्यू टीमचे सर्व सदस्य या वेळी
धरणावर पोहचले.
आम्ही आता पकडलेली मगर महाड येथे जाऊन सावित्री नदीमध्ये सोडणार आहोत. आता धरणात आणखी एक मगर असून तिलादेखील लवकरच पकडले जाईल.
-केतन भुजबळ,
वनक्षेत्रपाल, कर्जत
धरणाची रेकी केल्यानंतर आम्हाला धरणात दोन मगरी असल्याचे दिसून आले. धरणात ज्या ठिकाणी सर्वात खोलगट भाग आहे तेथे त्या दोन्ही मगरी दिसून येत होत्या. आम्ही पकडलेली मगर आणि धरणात असलेली मगर यात मोठा फरक असून धरणात अजूनही असलेली मगर ही किमान सात फूट लांबीची असल्याचे आम्हाला वाटते.
-मनोहर मेहेर, सदस्य,
रेस्क्यू टीम, बदलापूर
RamPrahar – The Panvel Daily Paper