Breaking News

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी तातडीने कडक उपाययोजना करा

पनवेल मनपा सभागृह नेते परेश ठाकूर यांची प्रशासनाला सूचना

पनवेल : रामप्रहर वृत्त
कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावावर नियंत्रण आणण्याकरिता तातडीने कडक उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणीवजा सूचना पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी गुरुवारी (दि. 25) महापालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याकडे केली. या संदर्भात त्यांनी निवेदनही दिले आहे.
या वेळी चर्चेसाठी महापौर डॉ. कविता चौतमोल, उपमहापौर जगदीश गायकवाड, पोलीस उपायुक्त श्री. दुधे, स्थायी समिती सभापती प्रवीण पाटील, नगरसेवक नितीन पाटील, अमर पाटील हेही उपस्थित होते.
आयुक्तांना दिलेल्या निवेदनात सभागृह नेते परेश ठाकूर यांनी म्हटले आहे की, पनवेल महापालिका क्षेत्रात वैश्विक कोरोना महामारीने थैमान घातले आहे. रुग्णांची दर दिवसागणिक 100ने भर पडत आहे. यामुळे जनतेमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासक म्हणून आपण या स्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी कडक पाऊले उचलणे आता काळाची गरज बनली आहे. पनवेल महापालिका क्षेत्रामध्ये कडक पद्धतीचे लॉकडाऊन अमलात आणण्याचे अत्यंत गरजेचे आहे. हे लॉकडाऊन किमान सात दिवसांचे असावे ज्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आणण्यास मदत होईल. जर काही कारणामुळे लॉकडाऊन जाहीर करण्यास
समस्या असेल, तर मार्केट परिसरातील गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी आणि कोरोनाबद्दल जास्तीत जास्त जनजागृती करण्यास प्रयत्न करावे.
याचबरोबर सद्यस्थितीत कोरोनाग्रस्त रुग्णांच्या हाय रिस्क कॉन्टॅक्टमधील व्यक्तींची जास्त प्रमाणात कोरोना चाचणी घेणे, त्यांचे रिपोर्ट्स लवकरात लवकर उपलब्ध करून देणे आणि रुग्णाला त्वरित हॉस्पिटलमध्ये दाखल करणे आवश्यक आहे, परंतु दुर्दैवाने असे घडताना दिसून येत नाही. त्यामुळे अनाठाई रुग्णसंख्या वाढ असल्याचे आढळून येत आहे. कामातील ही बेपरावाई व दिरंगाई निषेधार्ह आहे. जास्तीत जास्त संख्येच्या हाय रिस्क कॉन्टॅक्टमधील रुग्णांचा शोध घेणार्‍या यंत्रणांना त्यांनी काम तत्परतेने करण्याचे आदेश द्यावेत तसेच टेस्टचा रिपोर्ट लवकरात लवकर देण्याचे आदेश तपासणी लॅबना द्यावेत व बाधित रुग्णाला त्वरित हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची व्यवस्था करावी, अशीही महत्त्वपूर्ण मागणी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून केली आहे.
या संदर्भात योग्य ती उपाययोजना करण्याचे आश्वासन आयुक्त देशमुख यांनी दिले. दरम्यान, पनवेल शहरातील जी दाटीवाटीची ठिकाणे आहेत तिथे प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर कोळीवाडा, शिवाजी नगर झोपडपट्टी, कच्छी व पटेल मोहल्ला हे कटेन्मेंट झोन घोषित करण्यात आले आहेत.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply