15 जुलैच्या मध्यरात्रीपासून 10 दिवसांसाठी निर्णय लागू
अलिबाग : प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. त्यामुळे कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी 15 जुलैच्या मध्यरात्री 12 वाजल्यापासून ते 24 जुलैच्या मध्यरात्री 12 वाजेपर्यंत टाळेबंदी (लॉकडाऊन) करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या काळात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद ठेवण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील काही स्थानिक स्वराज्य संस्थांनी आपल्या क्षेत्रात यापूर्वीच लॉकडाऊन केले आहे. तेथेदेखील हा बंद लागू असेल, अशी माहिती रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी सोमवारी (दि. 13) पत्रकार परिषदेत दिली.
रायगड जिल्ह्यात पहिल्या लॉकडाऊनच्या काळात कोरोना रुग्णांची संख्या कमी होती. पनवेल व उरण तालुक्यातच रुग्ण वाढत होते, परंतु टाळेबंदी उठविण्यात आली तसेच निसर्गचक्रीवादळ आले. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर लोक जिल्ह्यात आले. त्यानंतर रुग्ण वाढू लागले. ग्रामीण भागातदेखील रुग्ण आढळू लागले. ही चिंतेची बाब आहे. परिस्थिती नियंत्रणाच्या बाहेर जाऊ नये यासाठी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. या बैठकीला सर्वपक्षीय आमदार, जिल्हाधिकारी निधी चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल हळदे, पोलीस अधीक्षक अनिल पासरकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. या वेळी पुन्हा लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
रायगड जिल्ह्याच्या सर्व प्रवेशव्दारांवर तपासणी केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. खारपाडा, खोपोली, ताम्हणी, कशेडी आदी ठिकाणी तपासणी नाके सुरू केले जातील. ई-पास असल्याशिवाय जिल्ह्यात प्रवेश दिला जाणार नाही. ई-पास पोलिसांकडून देण्यात येतील. अत्यावश्यक कामाशिवाय तसेच मास्क न लावता फिरणार्यांवर कारवाई करण्यात येणार आहे.
जिल्ह्यात कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांना व्यवस्थित उपचार मिळावेत यासाठी सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. कोविड केअर सेंटरची संख्या वाढविण्यात येणार आहे. प्रत्येक प्रांताधिकारी कार्यालयात एक नियंत्रण कक्ष सुरू करण्यात येईल. तेथे जिल्हा परिषद व महसूल विभागाचे कर्मचारी काम करतील.
काय सुरू? काय बंद?
लॉकडाऊनच्या काळात रुग्णालये, दवाखाने, औषधाची दुकाने या अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत. त्याचबरोबर प्रक्रिया करणारे कारखाने, रासायनिक व औषध निर्मिती करणारे कारखाने सुरू राहातील. ज्या कंपन्या 10 टक्के कामगार बोलवून सुरू आहेत त्यांना त्यानुसारच काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दूध व वर्तमानपत्र चालू राहातील, तर किराणा मालाची दुकाने, भाजीपाला, मटण, मासळी विक्री तसेच मद्यविक्री बंद ठेवण्यात येणार आहे. यादरम्यान किराणा मालाची घरपोच सेवा देण्यास परवानगी देण्यात आली आहे.
पनवेलमधील लॉकडाऊन वाढला
जिल्ह्यात लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर आता पनवेल महापालिका हद्दीत आधीच लागू असलेला लॉकडाऊनही 24 जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत वाढविण्यात आला आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper