Breaking News

चिरनेरचा पिढ्यान्पिढ्या सुरू असणारा गणेशमूर्ती व्यवसाय कोरोनामुळे संकटात

उरण : प्रतिनिधी

उरण तालुक्यातील चिरनेर येथील पिढ्यान्पिढ्या सुरू असलेला शाडू मातीपासून तयार करण्यात येत असलेल्या गणेश मूर्तींचा व्यवसाय यंदा कोसळलेल्या कोरोना संसर्गजन्य विषाणूच्या फैलावामुळे संकटात आला असून, 50 ते 60 टक्के व्यवसायाला उतरती कळा आली असल्याचे चित्र

निर्माण झाले आहे.

त्यातच राज्य शासनाने गणेशमूर्तीच्या उंचीला निर्बंध घातल्याने मोठ्या मूर्तींच्या कलाकुसरीमध्ये योग्य तो मोबदला मिळत होता. त्यातच कोरोना संसर्गामुळे मोठमोठ्या गणेशमंडळांवरही गदा आल्याने एक फूट, दोन फूट व अडीच फूट मूर्तिनांच सध्या काही प्रमाणात मागणी आहे.

यामध्ये शाडू मातीच्या 1 ते 2 फूट उंचीच्या गणेश मूर्तींना दोन ते तीन दिवस लागतात. तर अडीच ते चार फुटांपर्यंत उंचीच्या मूर्ती बनविण्यासाठी फिनिशिंग सह कच्या मूर्तींला चार ते पाच दिवसांचा कालावधी व फोटोफ्रेम प्रमाणे असलेल्या मूर्तींनाही तीन-चार दिवस मेहेंनत करावी लागत आहे. तर प्लास्टर ऑफ पॅरिसच्या दोन ते तीन दिवसांत 12 ते 15 मूर्ती तयार होतात. मात्र प्लास्टरच्या मूर्तींमुळे प्रदूषण वाढण्याचा धोका संभवत असून, शाडू मातीच्या मूर्ति पर्यावरण पूरक असल्याने त्यांचा खर्चही अधिक आहे. मात्र शाडू मातीच्या गणेश मूर्तींमुळे मूर्तिकारांच्या कलेला उत्तमप्रकारे वाव मिळत आहे.

या कुंभारवाड्यातील प्रसाद गजानन चौलकर यांच्या कारखान्यात यंदा शाडू मातीच्या लहान-मोठया 65 मूर्ति बनविण्यात आल्या असून, त्यांना या मूर्ति बनविण्यासाठी तीन ते साडेतीन महिन्यांचा कालावधी लागला आहे. तर प्लास्टर ऑफ पॅरिसच्या 90 मुर्ती ग्राहकांच्या मागणी नुसार पेण येथून कच्या स्वरूपात आणण्यात येत असून, त्यांची येथे रंगरंगोटी व कलाकुसर करण्यात येत आहे. अशाच प्रकारे या कुंभारवाड्यात एकूण 30 गणेश मूर्तींचे कारखाने आहेत. या प्रत्येक कारखान्यात शाडू मातीच्या मूर्ति तयार करण्यात येत असून, जवळपास 500 मूर्ति तयार केल्या जातात.

राज्य सरकारच्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींची बंदी जारी झाल्यानंतर चिरनेर येथील गणेश मूर्तींच्या अवगत कलेला पुन्हा एकदा महत्व प्राप्त होईल अशी आशा येथील मूर्तीकारांनी व्यक्त केली आहे. तर कोरोना संसर्गाच्या भितीपोटी राज्य शासनाच्या गणेशमूर्ति उंचीच्या बंधनामुळे येथील गणेश मूर्तींच्या व्यवसायावर विपरीत परिणाम झाला आहे. त्यामुळे येथील प्रत्येक कारखान्यात एक-दोन मूर्ती वगळता सरासरी दोन ते अडीच फुटांच्याच गणेशमूर्तींना अधिक मागणी वाढली आहे.

अशा वंश परंपरागत गणपती व्यवसाय करणारे बारा बलुतेदारांपैकी एक असलेले घटक कुंभार समाजातील कुंभरवाड्यातील मूर्तिकार चौलकर, हातनोलकर,चिरनेरकर, म्हशिलकर, गोरे, कुंभार व बिरवाडकर अशा प्रसिद्ध आडनावांचे मूर्तिकरांचे कारखाने कार्यरत आहेत. या चिरनेर येथील गणपती मूर्तींना मुंबई, ठाणे, नवीमुंबई, रायगडसह राज्याच्या विविध ठिकाणाहून मागणी आहे.

मागील 25 वर्षापासून प्लास्टर ऑफ पॅरिसच्या स्वस्त गणेश मूर्तींमुळे चिरनेरची कला लोप पावत चालली आहे. मात्र प्लास्टर ऑफ पॅरिसच्या वापरावर बंदी कायम झाल्यास येथील पर्यावरण पूरक शाडू मातीच्या गणेश मूर्तींचे प्रमाण तिप्पट होऊन येथील गणेशमूर्तीच्या कलाकुसरीच्या ग्राहकांचा योग्य प्रतिसाद मिळून व्यवसायाला चालना मिळेल.

– प्रसाद गजानन चौलकर,

मूर्तिकार, चिरनेर

शाडू मातीच्या गणेश मूर्तीला योग्य प्रकारे कोरीवकाम व फिनिशिंगही देता येते. त्याचप्रमाणे गिर्‍हाईकाच्या मनपसंत मूर्ति या कुंभारवाड्यात तयार करून मिळतात. त्यामुळे कित्येक वर्षांपासून येथे गणेश मूर्ति साकारण्याचे काम आजही आम्ही करत असून, त्याचा मोबदला आम्हाला योग्यतेने मिळतो.– रघुनाथ हातनोलकर, शाडू माती कामातील गणेशमूर्ती जाणकार, चिरनेर-कुंभारवाडा

Check Also

गिरवलेचे सरपंच प्रताप हातमोडे भाजपमध्ये दाखल

पनवेल : रामप्रहर वृत्तगिरवले गावचे सरपंच प्रताप चंद्रकांत हातमोडे यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी भारतीय जनता पक्षामध्ये …

Leave a Reply